Join us  

LPG Price : दिवाळीच्या तोंडावरच 'महागाईचा बॉम्ब' फुटला; एलपीजी सिलिंडर 265 रुपयांनी महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 8:27 AM

LPG Price 1 Nov: आजच्या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे. याआधी हा सिलिंडर 1733 रुपये होता.

नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आज 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, दिवाळीपूर्वी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. (LPG Price 1 Nov: LPG cylinder becomes costlier by Rs 265, inflation bomb explodes before Diwali)

आजच्या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे. याआधी हा सिलिंडर 1733 रुपये होता. मुंबईत 1683 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलिंडर आता 1950 रुपयांना मिळणार आहे. तसेच, आता कोलकातामध्ये 19 किलोचा इंडेन गॅस सिलिंडर 2073.50 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 2133 रुपये आहे.

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.

अनेक दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढदुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलची किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज, सोमवारी म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी आयओसीएलने जारी केलेल्या दर यादीनुसार पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 109.69 रुपयांना मिळत आहे. तर डिझेल 98.42 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल 115.50 रुपये आणि डिझेल 106.62 रुपये प्रतिलिटर झाले आहे. 

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय