Join us

LPG Price: LPG महागला! व्यावसायिक सिलेंडरचे दर १०५ रुपयांनी वाढले, तर घरगुती गॅसचे दर..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 8:04 AM

या दरवाढीनंतर मंगळवारपासून १९ किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,०१२ रुपये इतकी होणार आहे.

नवी दिल्ली – जागतिक स्तरावर रशिया-यूक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे १ मार्च रोजी एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. सिलेंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी (Commercial LPG Cylinder) करण्यात आली आहे. तर ५ राज्यांच्या निवडणुका सुरू असल्यानं घरगुती सिलेंडरच्या दरात ७ मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान ३ मार्च आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान ७ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे ७ मार्चनंतर घरगुती गॅस सिलेंडरसाठी तुमच्या खिशातून अधिकचा खर्च सहन करावा लागू शकतो. या दरवाढीनंतर मंगळवारपासून १९ किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत २,०१२ रुपये इतकी होणार आहे. तर ५ किलो सिलेंडरची किंमत २७ रुपयांनी वाढणार आहे. आता दिल्लीत ५ किलो सिलेंडरसाठी ५६९ रुपये मोजावे लागतील. तर मुंबईत १९ किलोसाठी १ हजार ९६३ रुपये द्यावे लागतील.

निवडणुकीनंतर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये १०० ते २०० रुपये वाढ?

सध्या देशात ५ राज्याच्या निवडणुका असल्याने मागील काही महिने विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत जास्त फरक झाला नाही. कच्च्या तेलाचे दर १०२ डॉलर प्रति बॅरेल झाल्यानंतरही ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती सिलेंडरच्या दरात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर म्हणजे ७ मार्च मतदानाचा अखेरचा टप्पा झाल्यानंतर कधीही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात १०० ते २०० रुपये प्रति सिलेंडर वाढ होण्याची शक्यता असल्याचं सांगितले जात आहे.

ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १७० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र ६ ऑक्टोबर २०२१ नंतर घरगुती सिलेंडरचे दर ना स्वस्त झाले ना महाग झाले. त्यामुळे आता निवडणुका संपल्यावर हे दर वाढतील अशी शक्यता आहे. देशात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एलपीजी सिलेंडरच्या दरात महिन्याला बदल केला जातो.

टॅग्स :गॅस सिलेंडर