नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) एलपीजीच्या किमतीत कपात (LPG Price Cut) केल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
तेल विपणन कंपन्यांनी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2024 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन दरांनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून आता 1879 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईबत सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये झाली आहे. तसेच, चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.
दरम्यान, IOCL वेबसाइटनुसार, हे बदललेले दर 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. याआधी 19 किलोच्या सिलिंडरच्या दरात सलग दोन महिने वाढ करण्यात आली होती. 1 मार्च रोजी 19 किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत 1795 रुपये, कोलकात्यात 1911 रुपये, मुंबईत 1749 रुपये आणि चेन्नईमध्ये 1960.50 रुपयांना मिळत होता.
घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाहीघरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई घरगुती वापरण्यासाठीचा सिलिंडर 802.50 रुपयांना मिळत आहे. दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत आहे.