Join us

अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पाहा नवीन दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 8:00 AM

तेल कंपन्यांनी सिलिंडरचे नवीन दर जारी केले आहेत.

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस आणि अर्थसंकल्पाच्या काही तास आधीच महागाईचा भडका उडाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून तेल विपणन कंपन्यांनी आज १ फेब्रुवारीपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या म्हणजेच अनुदानित १४ किलो एलपी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

तेल कंपन्यांनी सिलिंडरचे नवीन दर जारी केले आहेत. नवीन दरानुसार, व्यावसायिक गॅसच्या दरात १४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात केंद्राने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३०.५० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर जानेवारीत देखील व्यावसायिक गॅसचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस महागला आहे. 

आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपये, कोलकातामध्ये १८८७ रुपये, चेन्नईत १७२३.५० रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७२३.५० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९०२.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, चेन्नईत ९१८.५० रुपये इतका आहे.

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता लोकसभेत यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. मात्र, या अर्थसंकल्पापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे.

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय