LPG Price Hike : २०२३ या नववर्षाचा आज पहिलाच दिवस. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इंधन कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. कंपन्यांनी १ जानेवारी २०२३ पासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. परंतु कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दरवाढीनंतर दिल्लीत कमर्शिअल सिलिंडरची किंमत १७६९ रुपये झाली आहे. तर कोलकात्यात आता कमर्शिअल सिलिंडर १८७० रुपयांना मिळेल. मुंबई बद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत १७२१ रुपये आणि चेन्नईत ही किंमत १९१७ रुपये झाली आहे.
६ जुलै रोजी बदल
घरगुती सिलिंडरच्याबाबतीत बोलायचं झालं तर त्यात ६ जुलै २०२२ रोजी इंधन कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केली होती. गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत १५३.५० रुपयांची वाढ झाली आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्या समीक्षा करतात आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती बाबत निर्णय घेतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किंमतीत वाढ अथवा घट होत असते.
२०२२ मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत चार मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. यात मोठी वाढ करण्यात आली होती. यावेळीही महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नसली तर कमिर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.