नवी दिल्लीः 1 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर 15 रुपयांनी महागला आहे. आज नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी 605 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 630 रुपये द्यावे लागणार आहे. मुंबई, चेन्नईमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः 574.50 आणि 620 रुपये झाले आहेत. तर 19 किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत 1085 रुपये झाली आहे. कोलकात्यात 1139.50 रुपये, मुंबई 1032.50 रुपये आणि चेन्नईमध्ये याच 19 किलोच्या सिलिंडरचे दर 1199 रुपये आहे.
- सप्टेंबरमध्येही वाढले गॅस सिलिंडरचे दर
सप्टेंबरमध्ये दिल्लीत 14.2 किलो विनाअनुदानित सिलिंडर 590 रुपये होता. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 616.50 रुपये होता. तर मुंबई आणि चेन्नईत 14.2 किलो विनाअनुदानित सिलिंडरचा दर क्रमशः 562 आणि 606.50 रुपये होता. तसेच 19 किलोग्रामच्या दिल्लीतल्या सिलिंडरची किंमत 1054.50 रुपये होती. कोलकात्यात गेल्या महिन्यात 1114.50 रुपये, मुंबईत 1008.50 रुपये आणि चेन्नईत 1174.50 रुपये दर होता.
ऑगस्ट महिन्यात विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 62.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत 574 रुपये 50 पैसे इतकी होती. तर जुलै महिन्यात 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 637 रुपये मोजावे लागत होते. कोलकातामध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 601 रुपये, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गॅस सिलिंडरचे दर 546.50 रुपये झाले होते. तर चेन्नईमध्ये सिलिंडरचे दर 590.50 रुपये होते.