ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात जबरदस्त वाढ केली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर आता 101.50 रुपयांनी वाढले आहेत. हे नवे दर बुधवारी 1 नोव्हेंबर, 2023 पासून लागू होत आहे. अर्थात, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोग्रॅम एलपीजी सिलिंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबरला देखील कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांची वाढ झाली होती.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल नाही - ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कसल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये, कोलकात्यात 14 किलो सिलिंडरची किंमत 929 रुपये, मुंबईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 902.5 रुपये, तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 918.5 रुपये एवढी आहे.
काही महत्वाच्या शहरांतील कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर - या दर वाढीनंतर, दिल्लीत कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. 19 किलोचे गॅस सिलिंडर आता कोलकात्यात 1943 रुपयांना मिळेल. मुंबईमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर 1785.50 रुपये असेल. तर चेन्नईमध्ये हे सिलिंडर 1999.50 रुपयांना मिळेल.