घरगुती गॅस म्हणजेच एलपीजीच्या (LPG) किंमतीमध्ये पुढील आठवड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अंडर रिकव्हरी प्रति सिलिंडर 100 रुपयांहून अधिक झाली आहे. गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या परवानगीवर अवलंबून असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
एलपीजी गॅसच्या किंमतीचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जातो. यामुळे दिवाळीआधी येत्या 1 नोव्हेंबरला नवे दर जाहीर होतील. जर सरकारने दर वाढीसाठी परवानगी दिली तर गॅस सिलिंडरच्या दरात ही सलग पाचवी वाढ असणार आहे. यामध्ये घरगुती वापरातील गॅस आणि पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सबसिडीवाल्या गॅसचा समावेश आहे. तसेच सबसिडी नसलेल्या आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा देखील समावेश आहे.
एलपीजीच्या दरात गेल्या वेळी 6 ऑक्टोबरला 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलैनंतर एकूण 90 रुपयांची वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांना गॅसचा वाढलेला खरेदी खर्च सोसावा लागत आहे. तो अन्य खर्चासोबत जोडण्य़ाची परवानगी देण्यात आलेली नाही. हे अंतर कमी करण्यासाठी सरकारने अद्याप सबसिडी जाहीर केलेली नाही. यामुळे या कंपन्यांना एलपीजीच्या विक्रीमध्ये अंडर रिकव्हरी तोटा हा 100 रुपयांपेक्षा जास्त प्रति सिलिंडर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती खूप जास्त वाढल्या आहेत.
या महिन्यात सौदीचा एलपीजी दर 60 टक्क्यांनी वाढून 800 डॉलर प्रति टन झाला आहे. तर ब्रेट क्रूड 85.42 डॉलर प्रति बॅरलवर गेले आहे. एलपीजी अद्यापही नियंत्रणाखाली आहे. यामुळे कंपन्यांना अद्याप दर वाढविण्याची परवानगी नसल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागते. सरकार या बदल्यात त्यांना सबसिडी देते, असे सुत्रांनी सांगितले.