नवी दिल्ली : अनुदानित, विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यामुळे देशातील सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. अनुदानित गॅस सिलिंडर साडे सहा रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) ने याबाबतची माहिती शुक्रवारी दिली. अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाल्यानंतर दिल्लीत 14.2 किलोच्या गॅसची किंमत आता 507.42 रुपयांवरून 500.90 रुपयांवर आली आहे.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र, आता गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, याआधी गॅस सिलिंडरमध्ये 14.13 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपये 94 पैशांची वाढ करण्यात आली होती.