Join us  

लुलू समुहाच्या मालकानं खरेदी केलं १०० कोटींचं लक्झरी हेलिकॉप्टर, नेटवर्थ पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 5:34 PM

Lulu Group Chairman : लुलू ग्रुपचे चेअरमन एमए युसूफ अली यांनी 100 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. यानंतर लुलू ग्रुप आणि त्याचे चेअरमन पुन्हा चर्चेत आले आहेत.

Lulu Group Chairman Helicopter: लखनौच्या यशानंतर लुलू ग्रुप उत्तर प्रदेशमधील चार शहरांमध्ये मॉल उघडण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, लुलू ग्रुपचे चेअरमन एमए युसूफ अली यांनी 100 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. यानंतर लुलू ग्रुप आणि त्याचे चेअरमन पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर H145 Airbus हे अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. H145 हे जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टरमध्ये गणले जाते.

२४६ किमी प्रतितास वेगाने हे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकते. हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक केबिनसोबतच आपत्कालीन परिस्थितीत सर्च लाइट्स आणि कार्गो हुकही देण्यात आले आहेत. H145 एअरबसचा आतील भाग पूर्णपणे सपाट आहे, ज्यामुळे त्याला अधिक बसण्याची जागा मिळते. इतर हेलिकॉप्टरपेक्षा त्यात प्रवास करणे अधिक आरामदायी आहे. यामध्ये २ पायलट्ससह साधारण ८ प्रवासी प्रवास करू शकतात. आवश्यक असल्यास १० लोकांना याद्वारे प्रवास करता येतो.

अपघातात बचावले होते

लुलू ग्रुपचे मालक युसुफ अली यांच्याकडे यापूर्वी व्हीटी-वायएमए हेलिकॉप्टर होते, जे गेल्या वर्षी २०२१ मध्ये क्रॅश झाले होते. यामध्ये एम.ए.युसूफ अली आणि त्यांची पत्नी थोडक्यात बचावले. हे हेलिकॉप्टर केरळमध्ये कोसळले होते. कोची, बंगलोर आणि तिरुवनंतपुरम नंतर लखनौ हे भारतातील चौथे शहर आहे जिथे समूहाने स्वतःचे सुपरमार्ट उघडले आहे.

किती आहे नेटवर्थ

एमए युसूफ अली हे मूळचे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील आहेत. सध्या ते यूएईचे नागरिक आहेत. फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार, युसूफ अली ५ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ३७५०० कोटी रुपये) संपत्तीसह ३८ व्या स्थानावर आहे. लुलू समूहाचा व्यवसाय पश्चिम आशिया, अमेरिका आणि युरोपमधील ४२ देशांमध्ये पसरलेला आहे. या समुहामध्ये ५७ हजारांहून अधिक लोक काम करतात. एमए युसूफ अली हे UAE मध्ये राहणारे सर्वात श्रीमंत भारतीय NRI आहेत.

टॅग्स :संयुक्त अरब अमिरातीभारतव्यवसाय