Join us

लुलू ग्रुप 'या' शहरात बांधणार देशातील सर्वात मोठा मॉल; 6,000 लोकांना मिळणार रोजगार, 3000 कोटींची गुंतवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 11:43 AM

राज्यातील 6,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि 12,000 हून अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देईल, असे व्ही नंदकुमार यांनी सांगितले.

अहमदाबाद : गेल्या काही महिन्यांपूर्वी चर्चेत असलेला लखनौचा लुलू मॉल आता अहमदाबादमध्येही सुरू होणार आहे. लुलू ग्रुप भारतातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल उघडणार आहे. यासाठी लुलू ग्रुप एकूण 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, यूएई येथील अब्जाधीश युसूफ अली यांचा लुलू ग्रुप गुजरातमध्ये प्रवेश करत आहे, येथील अहमदाबादमध्ये भारतातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल उभारण्यासाठी 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पीटीआयच्या वृत्तानुसार, लुलू ग्रुपचे मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्सचे संचालक व्ही नंदकुमार म्हणाले की, 3,000 कोटी रुपयांच्या या शॉपिंग मॉलमध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील, त्याचे बांधकाम लवकरच सुरू होईल. तसेच, कोची, (केरळ) आणि लखनौ (उत्तर प्रदेश) नंतर लुलू ग्रुपचा हा देशातील तिसरा शॉपिंग मॉल असणार आहे आणि राज्यातील 6,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि 12,000 हून अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देईल, असे व्ही नंदकुमार यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षीच्या सुरुवातीला या मेगा शॉपिंग मॉलची पायाभरणी करण्यात येणार आहे. मॉलमध्ये एकूण 300 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड स्टोअर्स असतील. 3,000 लोकांची क्षमता असलेले एक रेस्टॉरंटही असेल. याशिवाय, 15 स्क्रीन्सचा मल्टीप्लेक्स सिनेमा हॉल देखील असणार आहेत. तसेच, या मॉलमध्ये भारतातील सर्वात मोठे चिल्ड्रन अॅम्युझमेंट पार्कही सुरू करण्यात येणार असल्याचे व्ही नंदकुमार यांनी सांगितले.

याचबरोबर, अहमदाबादमध्ये भारतातील सर्वात आलिशान शॉपिंग मॉल बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा शॉपिंग मॉल भारतात आणि परदेशातील प्रत्येकासाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही, असेही व्ही नंदकुमार म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे दुबईच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी लुलू ग्रुपसोबत सामंजस्य करार केला होता. या सामंजस्य करारांतर्गत लुलू ग्रुप गुजरातमधील अहमदाबादमध्ये मॉल उघडणार आहे. 

टॅग्स :व्यवसायगुजरातअहमदाबाद