जालंधर/लुधियाना : लग्न समारंभासाठी आॅडी, बीएमडब्ल्यू, जॅग्वार, मर्सिडीज यांसारख्या लक्झरी कार भाड्याने देण्याचा पंजाबातील अनोखा व्यवसाय भारत-पाक तणावामुळे धोक्यात आला आहे. कॅनडा आणि अमेरिकेत राहणारी पंजाबी कुटुंबे आॅक्टोबर ते फेब्रुवारी या काळात लग्नासाठी मोठ्या संख्येने पंजाबात येतात. ते महागड्या गाड्या भाड्याने घेतात. तथापि, यंदा भारत आणि पाक तणाव असल्यामुळे अनिवासी भारतीय पंजाबी नागरिक मायदेशी आलेच नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे. लुधियाना-मोगा महामार्गावर अशा गाड्या भाड्याने देणारे अनेक व्यावसायिक आहेत. आपल्या गाड्या सजूनधजून तयार ठेवल्या आहेत. पण ग्राहकच नाही. त्यांचा धंदा बसला आहे. या व्यवसायात असलेले जोगिंदर सिंग यांनी सांगितले की, आॅडीचे विविध मॉडेल १८ हजारांपासून २६ हजार रुपयांपर्यंत भाड्याने मिळते. बेंटलीचे भाडेही याच टप्प्यात आहे. लिंकन लिमोझिनचा दर ४0 हजार, तर जॅग्वार एक्सईचा ५0 हजार आहे. मर्सिडीज-बेंझ ई-क्लास अवघ्या ८ हजारांच्या भाड्यात वापरता येते. पण यंदा बुकिंगच नाही. माझ्याकडे आॅक्टोबरमध्ये फक्त १ बुकिंग झाले आहे. लुधियानाजवळील जॅझ कार रेंटल या संस्थेचे मालक अमरजित सिंग यांनी सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीमुळे पंजाबात तणावाचे वातावरण राहणार असे दिसते. त्यामुळे अनिवासी भारतीय येतील असे वाटत नाही. (वृत्तसंस्था)>व्यापारी म्हणतात, यंदा धंदा बसला आहे...जालंधर-फगवारा महामार्गावरील परमजित सिंग यांची पंजाब वेडिंग कार्स नावाची संस्था आहे. या मार्गावरील बड्या व्यवसायिकांत त्यांचा समावेश होतो. त्यांनी सांगितले की, आॅक्टोबर ते फेब्रुवारी हा आमचा व्यवसायाचा काळ आहे. वराकडील मंडळी वधूकडील मंडळींवर प्रभाव टाकण्यासाठी या गाड्या प्रामुख्याने भाड्यावर घेतात. पंजाबातील लग्नात या गाड्या स्टेटस सिम्बॉल बनल्या आहेत. पण यंदा धंदा बसला आहे.
लक्झरी कार व्यवसाय संकटात
By admin | Published: October 18, 2016 6:40 AM