एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या मर्जरनंतर बँक जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरली आहे. कंपनीचं व्हॅल्युएशन आता १६ लाख कोटींवर गेलंय. हे रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षाही अधिक आहे. परंतु एचडीएफसीसारखा ब्रँड उभा करण्यात सर्वात मोठं योगदान कोणाचं होतं हे माहितीये? हे नाव आहे दीपक पारेख. ते जवळपास ४५ वर्षे कंपनीसोबत होते. त्यांनी आता आपल्या पदावरून निवृत्ती घेतली आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न हा येतो की दीपक पारेख यांनी का कधी अधिक वेतन घेतलं नाही किंवा अधिक शेअर्स घेतले नाही.
दीपक पारेख हे असे व्यावसायिक आहेत, ज्यांना शो ऑफ वर विश्वास नाही. विनाकारण खर्च करणाऱ्यांपैकी ते नाही. दरम्यान, देशभरातील लाखो लोकांना कर्ज देणाऱ्या पारेख यांनी मात्र आपल्या स्वत:साठी मात्र कधी कर्ज घेतलेलं नाही.
२१ व्या वाढदिवसाचा किस्सा
दीपक पारेख यांच्या २१ वाढदिवसाचा अनोखा किस्सा आहे. सीएचा अभ्यास केल्यानंतर ते लंडनमध्ये आर्टिकलशिप करत होते. मित्रांना वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी त्यांनी एक फिक्स बजेट सुरू केलं. परंतु त्यांच्या पार्टीचं बिल अधिक आलं. त्यावेळी त्यांनी आपल्या मित्रांकडून उर्वरित रक्कम मागून घेतली. असेच फिक्स खर्च त्यांच्या जीवनाचा भाग आणि व्यवसायाचा मूलमंत्र बनले. म्हणून त्यांनी असेट व्हॅल्यू ऐवजी लोकांना आणि कंपन्यांना कॅश फ्लो वर कर्ज देण्यास सुरुवात केली.
शेअर होल्डर नाही, कमी पगारावर काम
एचडीएफसीची सुरूवात दीपक पारेख यांचे काका हसमुख पारेख यांनी केला. त्यांना अपत्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी कामकाज सांभाळण्यासाठी दीपक पारेख यांना बोलावलं. हवं असतं तर दीपक पारेख यांना एच़़डीएफसीचे शेअर्स ठेवता आले असते. परंतु कायम त्यांनी सॅलरीवर काम केलं.
ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत आपण कायमच सॅलरीवर काम केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी कंपनी १०० टक्के आपलीच असल्याप्रमाणे त्याचं कामकाज पाहिलं. त्यांच्याकडे एचडीएफसीचे ०.४ टक्के शेअर्स आहेत ते त्यांच्या एम्पलॉई स्टॉक ऑप्शनचा भाग आहेत. त्यांनी कधीही कंपनीत भागीदारी वाढवण्याचा किंवा शेअर्स ठेवण्यचा विचार केला नाही. तसंच आणखी शेअर्स घेण्याची त्यांची इच्छाही झाली नाही.
"खाण्यासाठी दोन वेळचं अन्नच खूप"
"तुम्ही अतिरिक्त पैशांचं काय करणार? तुम्ही दिवसातून दोन वेळा जेवता, पुढेही तेच करणार. जेव्हा तुमची वेळ येईल, तेव्हा तुम्ही नसाल. तुमच्याकडे तुमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक पैसा असला पाहिजे," असं कारण यामागे असल्याचं पारेख म्हणाले होते.