जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी असलेल्या अॅपलला (Apple) भारतातील व्यवसायाचा प्रचंड फायदा झाला आहे. अमेरिकन कंपनी ॲपलनं आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतातून पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे iPhones निर्यात केले. आर्थिक वर्ष २०२२ च्या तुलनेत ही निर्यात चार पटींनी अधिक आहे. भारतातून पाच अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा आकडा गाठणारा ॲपल आयफोन हा पहिला ब्रँड असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ॲपलनं गेल्या काही वर्षांत भारतात आयफोनचं उत्पादन वाढवलं आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतातून एकूण १० अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन्सची निर्यात करण्यात आली. भारतानं एका आर्थिक वर्षात प्रथमच हे यश मिळवले आहे.
तीन मजले, महिन्याचं भाडं ४२ लाख; रेव्हेन्यूही शेअर करावा लागणार, असं असेल पहिलं Apple स्टोअर; करारात या अटी
ॲपलनं आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारतातून १.६ अब्ज डॉलर्स किंमतीचे iPhones निर्यात केले. आयफोनच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा अजूनही केवळ पाच टक्के आहे. ट्रेड अँड इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगनं (Samsung) गेल्या आर्थिक वर्षात भारतातून ३.५ ते ४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली. भारत आता यूके, इटली, फ्रान्स, मीडल इस्ट, जपान, जर्मनी आणि रशिया या विकसित देशांमध्ये स्मार्टफोनची निर्यात करत आहे. ॲपल आणि सॅमसंगनं त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर दिलेलं नाही. ॲपल १८ एप्रिलला मुंबईत आणि २० एप्रिलला दिल्लीत रिटेल स्टोअर उघडणार आहे. यासाठी कंपनीचे सीईओ टिम कुक (Tim Cook) भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
कसं असेल ॲपल स्टोअर?
ॲपलचं पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये (Jio World Drive Mall) सुरू होणार आहे. या स्टोअरचं नाव Apple BKC असं असेल. हे स्टोअर ॲपल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं (Apple India Private Limited) भाडेतत्वावर घेतलं आहे आणि भाडेकरू इंडियन फिल्म कंबाईन प्रायव्हेट लिमिटेड (The Indian Film Combine Private Limited) असेल. कमर्शियल रियल्टी तज्ज्ञांच्या मते जिओ वर्ल्ड ड्राईव्ह (Jio World Drive) ५ लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. यापैकी ॲपलनं तीन मजल्यांवर ७,०१४ चौरस फूट, ७,०१४ चौरस फूट आणि ६,७७८ चौरस फूट अशी तीन मजल्यांवर २०,८०६ चौरस फूट क्षेत्र भाड्यानं घेतलं आहे.