रोम :
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची निर्यात सहा टक्के वाढून विक्रमी ४४७ अब्ज डॉलरवर पोहोचली. तर एकूण निर्यात ७७० अब्ज डॉलर्स एवढी झाली. यासंदर्भात वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी माहिती दिली. मुख्यत: पेट्रोलियम उत्पादने, औषधी, रसायने आणि सागरी उत्पादने यांच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
गोयल हे ११ ते १३ एप्रिल या काळात फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुंतवणूक व व्यापार वाढविण्यासाठी दोन्ही देशांचे नेते आणि कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
घेतल्या. गोयल यांनी रोममध्ये पत्रकारांना सांगितले की, भारताची निर्यात क्षेत्रातील कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.
निर्यातवाढीतून भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात विस्ताराचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी सांगितले की, युरोप आणि अमेरिकेतील मागणी घटत असताना भारताने निर्यात क्षेत्रात केलेली कामगिरी अर्थव्यवस्थेसाठी उत्साहवर्धक आहे.
माेबाईल निर्यात दुप्पट
- देशाच्या एकूण निर्यातीमध्ये माेबाईल फाेनचा वाटादेखील वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात माेबाईलची निर्यात ९० हजार काेटी रुपये एवढी झाली. यावेळी त्यात दुप्पट वाढ झाली आहे.
- आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४५ हजार काेटी रुपये एवढी माेबाईल फाेनची निर्यात झाली हाेती. याशिवाय इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्रातील निर्यात देखील ५८ टक्क्यांनी वाढून १ लाख ८५ हजार काेटी रुपये एवढी राहीली.
या मेड इन इंडिया फाेनची सर्वधिक निर्यात
ॲपल आयफाेन ४५ हजार काेटी
सॅमसंग ३६ हजार काेटी
१४.८% मार्चमध्ये चीनची निर्यात वाढली
मार्च २०२३ मध्ये चीनची निर्यात १४.८ टक्के वाढून ३१५.६ अब्ज डॉलर झाली आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीत चीनची निर्यात ६.८ टक्के घसरली होती. मार्चमध्ये चीनची आयात १.४ टक्के घटून २२७.४ अब्ज डॉलर झाली.
त्याआधीच्या दाेन महिन्यांत चीनची आयात १०.२ टक्के घटली होती. चीनच्या सीमा शुल्क विभागाने ही माहिती जारी केली आहे.
- ४२२ अरब डॉलर्स एवढी भारताची निर्यात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये होती.
- ७७० अब्ज डॉलर्स एवढी एकत्रित निर्यात २०२२-२३ मध्ये झाली.
- २०२२-२३ मध्ये भारताची आयात १६.५% वाढून ७१४ अब्ज डॉलर झाली. वस्तू व सेवांची एकत्रित आयात ८९२ अब्ज डॉलर राहिली.