लवकरच भारतात बनवलेल्या चिप्स तुमच्या मोबाईलमध्ये आणि इतर उपकरणांमध्ये दिसणार आहेत. अमेरिकन चिप (Semiconductor) कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीजनं गुजरातमधील साणंदमध्ये प्रकल्पाचं बांधकाम सुरू झाल्याची माहिती दिली. ही भारतातील पहिली चिप बनवणारी कंपनी असेल. या प्रकल्पासाठी हायरिंगही सुरू करण्यात आल्याची माहिती कंपनीनं शनिवारी दिली.
शनिवारी या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान, या प्रकल्पाच्या उभारणीचं काम टाटा प्रोजेक्ट्सला देण्यात आल्याची माहिती मायक्रॉननं दिली. कंपनी या प्रकल्पात चिप असेंबल आणि टेस्ट करणार आहे. मायक्रॉनचा हा प्लांट अहमदाबादजवळील साणंद शहरात उभारला जात आहे. दरम्यान, हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये उभारला जाईल.
४ हजार कोटींचा खर्च
पहिल्या टप्प्यात ५,००,००० चौरस फूट क्षेत्रफळात प्रकल्प उभारला जाणार आहे. सुरुवातीला यात ४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रिपोर्ट्सनुसार, हा प्रकल्प २०२४ च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. टाटा प्रोजेक्ट्सकडेही काही ऑपरेशनल पार्ट्स राहतील.
५ हजार नोकऱ्या
या प्रकल्पातून ५ हजार लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याचं मायक्रॉनचं म्हणणं आहे. तर अप्रत्यक्षरित्या १५ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या प्लांटची सप्लाय चेन सुधारण्यासाठी सरकार येत्या ६ महिन्यांत हायस्पीड ट्रेन चालवण्याबाबत चर्चा आहेत. ही ट्रेन साणंद ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.