नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत वाहनांची निर्यात १५.५ टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत देशातून ११,९२,५७७ गाड्यांची निर्यात करण्यात आल्याची माहिती वाहन उत्पादक कंपन्यांची संस्था सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) रविवारी दिली. रिक्षा वगळता अन्य सर्व श्रेणीतील वाहनांच्या निर्यातीत वाढ झाल्याचे सियामने स्पष्ट केले आहे.
मागील वर्षी याच कालखंडात १०,३२,४४९ वाहनांची निर्यात करण्यात आली होती. या तिमाहीत १,८०,४८३ इतकी प्रवासी वाहने परदेशात पाठविण्यात आली. यात १९ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी १,५२,१५६ प्रवासी वाहनांची निर्यात करण्यात आली होती.
मागील आर्थिक वर्षात जगभरातील विविध विदेशी बाजारांमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटांचा मोठा फटका वाहन निर्यातीला बसला होता. त्यामुळे एकूण वाहन निर्यात ५.५ टक्क्यांनी घटली होती.
निर्यात कितीने वाढली?
प्रकार २०२४ २०२३ वाढ/घट
दुचाकी वाहने ९,२३,१४८ ७,९१,३१६ १७%
व्यापारी वाहने १५,७४१ १४,६२५ ८%
तीन चाकी ७१,२८१ ७३,३६० -३%
वाढलेली निर्यात हा चांगला संकेत आहे. व्यापारी वाहनांच्या निर्यातीत पहिल्यांदाच वाढ होताना दिसत आहे. मागील संपूर्ण वर्षभर ट्रक आणि बसच्या निर्यातीत सातत्याने मोठी घट झालेली दिसत होती. दुचाकी आणि प्रवासी वाहनांची निर्यात वाढणे हे सकारात्मक चिन्ह आहे.
- विनोद अग्रवाल, अध्यक्ष, सियाम