नवी दिल्ली : भारतात ७ लाखांपेक्षा अधिक क्रिएटर आणि भागीदार युट्यूबवर जबरदस्त कमाई करीत आहेत, अशी माहिती ‘ऑक्सफर्ड इकनॉमिक्स’ने दिली आहे. दुसरीकडे, युट्यूबने म्हटले की, भारतातील अनेक चॅनल्सनी फॅन फंडिंगद्वारे बहुतांश कमाई केली असून, यंदा चॅनल्सच्या कमाईत १० टक्के वाढ झाली आहे.
व्हिडीओ स्ट्रिमिंग कंपनी युट्यूबने गुरुवारी व्हिडीओ क्रिएटर्ससाठी ‘ब्रँडकनेक्ट’ आणि ‘पॉडकास्ट’ या नव्या फिचर्सची घोषणा केली. ‘ब्रँडकनेक्ट’ हा युट्यूबचा ब्रँडेड साहित्याचा मंच आहे. पात्र क्रिएटर्सना तसेच निवडक जाहिरातदारांना तो उपलब्ध होईल.
पॉडकास्ट फिचर युट्यूब म्युझिकच्या सेक्शनमध्ये दिसेल. ते ऑफलाइनही उपलब्ध असेल. यातून जाहिराती आणि सबस्क्रिप्शन याद्वारे उत्पन्न मिळू शकेल. शॉर्टस्साठी कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणार आहे. त्यामुळे हे फिचर आणखी सुलभ होईल. (वृत्तसंस्था)