Madhabi Puri Buch Update: सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर सोमवारी काँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात आले. माधबी या २०१७ ते २०२१ पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. त्या २०२२ मध्ये सेबीच्या प्रमुख झाल्या. मात्र या काळात माधबी यांनी सेबी आणि आयसीआयसी बँकेकडून सॅलरी घेतली. २०१७ ते २०२४ यादरम्यान माधबी यांनी आयसीआयसीआय बँकेतून जवळपास १६.८० कोटी रुपये सॅलरी घेतली, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता आयसीआयसीआय बँकेनं या आरोपांचं खंडन केलंय. सेबी प्रमुखांना कोणतीही सॅलरी किंवा ईसॉप्स दिले नसल्याचं बँकेनं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटलंय.
'सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांना वेतन दिल्याच्या बातम्या आमच्या निदर्शनास आल्या आहेत. आयसीआयसीआय बँक किंवा त्याच्या समूहातील कंपन्यांनी माधाबी पुरी बुच यांच्या निवृत्तीनंतर कोणतेही वेतन दिलं नाही किंवा कोणतीही ईसॉप्स जारी केली नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो,' असं आयसीआयसीआय बँकेनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय.
आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, माधबी पुरी बुच यांनी ३१ ऑक्टोबर २०१३ पासून निवृत्तीचा निर्णय घेतला. 'माधबी पुरी बुच यांना निवृत्तीनंतरची सर्व देयके आयसीआयसीआय समूहातील त्यांच्या नोकरीदरम्यान देण्यात आली आहेत, ज्यात ईसॉप्स आणि सेवानिवृत्ती लाभांचा समावेश आहे,' असंही बँकेनं स्पष्ट केलंय.
'ग्रुप जॉब दरम्यान निश्चित केलेल्या नियमांनुसार त्यांना पगार, निवृत्ती लाभ, बोनस आणि ईसॉप्स देण्यात आले. बँकेच्या ईसॉप्स नियमांनुसार, वाटपाच्या तारखेपासून पुढील काही वर्षांत ईसॉप्स वापरण्याचा पर्याय आहे. त्यांना ईसॉप्स देताना घालून दिलेल्या नियमांनुसार कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचाऱ्याला देण्याच्या तारखेपासून १० वर्षांच्या आत ईसॉप्स वापरण्याचा पर्याय होता,' असंही बँकेनं म्हटलंय.
माधबी यांच्या राजीनाम्याची मागणी
"२०१७ ते २०२४ दरम्यान आयसीआयसीआय बँक कोट्यवधी रुपयांचं नियमित उत्पन्न घ्यायची आणि त्याच बँकेकडून ईसॉप्सवरील टीडीएस देखील भरला जायचा जे सेबीच्या कलम ५४ चे थेट उल्लंघन आहे. त्यामुळे जर माधबी पुरी बुच यांना काही वाटत असेल तर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा," असंही खेरा म्हणाले होते.