- राजेंद्र दर्डा
(एडिटर इन चीफ, लोकमत)
प्रसिद्ध उद्योजक, बजाज ऑटोचे माजी उपाध्यक्ष आणि माझे जिवलग मित्र मधुर बजाज यांच्या निधनाचे वृत्त खूप दुःखद आणि वेदनादायी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील बजाज ऑटोच्या प्रकल्पामुळे या परिसरात जलद प्रगती व समृद्धीचं नवं युग सुरू झालं, हे निर्विवाद आहे. या प्रकल्पाच्या विकासात मधुरजींची मोलाची भूमिका होती. त्या काळात ते या ऐतिहासिक शहरात वास्तव्यास होते. आमच्या वारंवार भेटी होत आणि अनेक अर्थपूर्ण चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण होत असे. अगदी अलीकडेच, १९ मार्च रोजी मुंबईतील राजभवनात पार पडलेल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार समारंभाला ते आवर्जून आले होते आणि शेवटपर्यंत थांबले. त्यावेळी आमचा मनमोकळा संवाद झाला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
१९९४ मध्ये महाएक्स्पो या भव्य औद्योगिक प्रदर्शन समितीचे मधुरजी अध्यक्ष होते आणि त्यांच्यासोबत काम करतानाचे क्षण आजही आमच्या स्मरणात घर करून आहेत. त्या काळात ते नाथ व्हॅली स्कूलच्या कार्यातही रस घेत असत. तसेच, या शहरातील काही समविचारी कलाप्रेमी व्यक्तींनी स्थापन केलेल्या ‘कलासागर’ या अग्रणी सांस्कृतिक संस्थेशीही ते सक्रियपणे जोडलेले होते.
मधुरजींनीच मला इंग्रजी दैनिक सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. या भागाबाहेरील अनेक उद्योजक व उद्योग आणि अन्य क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारीही हीच मागणी करत होते. याच प्रेरणेतून पुढे ‘लोकमत टाइम्स’ची स्थापना झाली. मधुरजी अत्यंत दिलखुलास स्वभावाचे, मित्रांच्या गटात नेहमी हास्यविनोद करून वातावरण खुलवणारे होते.
त्यांना आम्हा मित्रांविषयी खरी आपुलकी होती. मला २००० मध्ये हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा मी ऊर्जा मंत्रिपदावर होतो. ते मंत्रालयात मला भेटण्यासाठी आले.
काळजीच्या सुरात त्यांनी सांगितलं, ‘काम करायलाच हवं, पण एक आरामखुर्ची घ्या आणि दररोज अर्धा तास तरी विश्रांती घ्या’, असं प्रेमळ मैत्र होतं त्यांचं मन. खरंच, आम्हा सर्व जवळच्या मित्रांना त्यांची उणीव कायम जाणवत राहील. मधुरजींना विनम्र श्रद्धांजली. मराठवाडा व महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. बजाज कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.