मुंबई - भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब बजाजमधील एक महत्त्वाचा सदस्य असलेल्या मधुर यांनी कंपनीत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. बजाज कंपनीचे सर्वात मोठे आधारस्तंभ असलेले राहुल बजाज यांचे ते चुलत बंधू होत. राहुल बजाज यांचे निधन झाल्यानंतर दोन वर्षांतच मधुर यांनी २०२४ मध्ये बजाज ऑटोच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
सध्या ते देशातील एक आघाडीची वित्तीय संस्था असलेल्या बजाज फिनसर्व्हचे संचालक म्हणून कार्यरत होते. मधुर यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. १९७३ मध्ये सिडेनहॅम कॉलेज, मुंबई येथून बी.कॉम पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी १९७९ मध्ये स्वित्झर्लंडमधील लॉसाने येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (आयएमडी) येथे एमबीए केले. मधुर यांनी बजाज होल्डिंग्ज ॲंड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड, स्टील आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत मुकुंद लिमिटेड व बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये महत्त्वाची पदे भूषवली. या कंपन्यांच्या गुंतवणूक तसेच धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार मधुर बजाज यांची एकूण संपत्ती ३५ हजार कोटी रुपये एवढी होती. गत मार्चपर्यंत त्यांच्याजवळ सार्वजनिक क्षेत्रातील ८ कंपन्यांचे शेअर्स होते. ज्यांची शेअर बाजारातील किंमत सुमारे २,८९० कोटी रुपये आहे. मधुर बजाज यांना इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडियाकडून ‘विकास रतन’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
भारतातील ऑटोमोबाईल निर्माता कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या एसआयएएमच्या तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर्स (एमसीसीआए) या संघटनांच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. सध्या ते भारतीय उद्योग परिसंघाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य होते.