Join us

नागपूर मेट्रो रेल्वेच्या अध्यक्षपदी मधुसूदन प्रसाद

By admin | Published: February 16, 2015 11:55 PM

- नव्याने नियुक्ती : बोर्डाची बैठक मार्चमध्ये

- नव्याने नियुक्ती : बोर्डाची बैठक मार्चमध्ये
नागपूर : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयात सचिवपदी नव्याने रुजू झालेले मधुसूदन प्रसाद यांच्याकडे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणारी बोर्डाची पहिली बैठक आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्राच्या शहरी विकास मंत्रालयाचा सचिव हा नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पूर्वीचे सचिव शंकर अग्रवाल यांची इतरत्र बदली झाली असून, त्यांच्याजागी रुजू झालेले प्रसाद यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रसाद यांच्यासह अन्य पदसिद्ध सदस्यांमध्ये केंद्राच्या शहरी विकास खात्यातील मुकुंद कुमार सिन्हा व झान्जा त्रिपाठी, कोची मेट्रोचे वेदमणी तिवारी, भारतीय रेल्वेचे शैलेंद्र सिंग, व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, अतिरिक्त वित्त सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, यूडीआयचे प्रधान सचिव नितीन करीर, नागपूरचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांचा समावेश आहे.
मार्चमध्ये बोर्डाची बैठक
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे. नोंदणीची कागदपत्रे सोमवारी कंपनीकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. नोंदणीमुळे प्रत्यक्ष कामाला वेग आला आहे. शिवाय जागेच्या सर्वेक्षणाचे काम वेगात सुरू आहे. पुढील कामाच्या रूपरेषेसाठी बोर्डाची पहिली बैठक आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पहिल्या बैठकीत सल्लागाराची तात्पुरती नियुक्ती, विकासाची रूपरेषा आणि प्रत्यक्ष कामावर चर्चा होणार आहे. सहा महिन्यानंतर निविदेनंतर पूर्णवेळ नियुक्ती होईल. प्रकल्पाचे डिझाईन, ड्रॉईंग, व्हिजन, क्वॉलिटी कंट्रोल यासह विभिन्न कामांचा भार त्यांच्यावर राहील. या क्षेत्रात काम केलेल्या कंपन्या पात्र राहतील. त्या देशातील वा विदेशातील असू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.