मॅगी, किटकॅट, नेस्कॅफे यासारखी प्रसिद्ध उत्पादनं तयार करणारी नॅस्ले कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी नॅस्लेचं उत्पादन असलेली मॅगी भारतात अडचणीत आली होती. मात्र आता नॅस्ले अन्न आणि औषध प्रशासन किंवा कोणत्या सरकारमुळे अडचणीत आलेली नाही. तर अंतर्गत अहवालातील माहिती उघडकीस आल्यानं नॅस्लेच्या समस्या वाढल्या आहेत. कंपनीकडून तयार होत असलेली ६० टक्क्यांहून अधिक उत्पादनं आरोग्यदायी नसल्याची माहिती अंतर्गत अहवालात आहे.नॅस्लेकडून खाद्यपदार्थ आणि पेयांची निर्मिती केली जाते. यापैकी ६० टक्के उत्पादनं आरोग्यदायी नसून या उत्पादनांच्या पोषणमूल्यांबद्दल तपास सुरू असल्याची माहिती खुद्द नॅस्लेनं दिली आहे. याबद्दलचा तपास पूर्ण झाल्यावर रणनीती बदलून काम सुरू केलं जाईल. हे प्रकरण आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे उत्पादनं अधिकाधिक आरोग्यदायी आणि चविष्ट करण्यासाठी काम करू, असं नॅस्लेकडून सांगण्यात आलं आहे.नॅस्लेच्या उत्पादनांबद्दलचं एक वृत्त 'फायनान्शियल टाईम्स'नं प्रसिद्ध केलं आहे. 'नॅस्लेनं एक अंतर्गत सर्वेक्षण केलं होतं. नॅस्लेच्या ३७ टक्के खाद्यपदार्थ आणि पेयांचं रेटिंग ३.५ इतकं आहे. ऑस्ट्रेलियातील हेल्थ स्टार रेटिंग सिस्टिमनं हे रेटिंग दिलं आहे. हेल्थ स्टारकडून १ ते ५ दरम्यान रेटिंग पॉईंट दिले जातात,' असं नॅस्लेचं सर्वेक्षण सांगतं. नॅस्लेचा मॅगी ब्रँड एकट्या भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. नॅस्कॅफे ब्रँडदेखील लोकांच्या पसंतीस उतरला आहे.नॅस्लेच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार ६० टक्के उत्पादनं आरोग्यदायी नाहीत. विशेष म्हणजे, आमची काही उत्पादनं कधीच आरोग्यदायी नव्हती आणि त्यात सुधारणा केल्यावरही त्यात बदल झालेला नाही, अशी माहिती सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आली आहे. 'आम्ही आमचा पूर्ण पोर्टफोलियो बदलण्यासंदर्भात विचार करत आहोत. लोकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना पोषणमूल्य असलेली उत्पादनं पुरवली जातील,' असं कंपनीनं सर्वेक्षणात म्हटलं आहे.
नॅस्लेची उत्पादनं चवीनं खाता? मग तुमच्या आरोग्याला मोठा धोका; धक्कादायक माहिती उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 1:46 PM