Maha Kumbh 2025 :उत्तर प्रदेशातेल प्रयागराजमध्ये येत्या 13 जानेवारीपासून महाकुंभ-2025 ची सुरुवात होणार आहे. महाकुंभाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या पवित्र सोहळ्यासाठी देशभरातील साधू-संतांसह जगभरातील अनेक भाविकांची उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे, या भव्य कार्यक्रमात अब्जाधीश गौतम अदानी महाप्रसाद सेवा देणार आहेत. यानुसार, दररोज 1 लाख भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
या पवित्र महाकुंभाची सुरुवात 13 जानेवारीपासून होणार असून, 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी 40 कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी या महाकुंभात सेवा देणार आहेत. यासाठी त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस (ISKON) सोबत हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून दररोज सुमारे 1 लाख भाविकांना महाप्रसाद सेवा दिली जाणार आहे.
2500 स्वयंसेवक प्रसाद तयार करणार मीडिया रिपोर्टनुसार, या सेवेमध्ये सुमारे 1 लाख भाविकांना प्रसाद दिला जाईल, ज्यामध्ये 18,000 स्वच्छता कर्मचारी देखील सहभागी होतील. हा प्रसाद हायटेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या 2 स्वयंपाकघरात 2500 स्वयंसेवक दररोज तयार करतील.
प्रसादात काय मिळेल?महाप्रसादात रोटी, डाळ, भात, भाजी आणि मिठाईचा समावेश असेल. हा प्रसाद पानांपासून बनवलेल्या इको फ्रेंडली ताटांवर भाविकांना दिला जाणार आहे. यासाठी 40 असेंब्ली पॉइंट्स निश्चित करण्यात आले असून, तेथे भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. एवढंच नाही तर या मेळ्यात येणारे दिव्यांग, वृद्ध आणि लहान मुले यांच्यासाठी अदानी समूहातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभात सहभागी होणार; संन्यासी आयुष्य जगणार...
महाप्रसाद सेवेव्यतिरिक्त, गौतम अदानी यांच्या समूहाने गोरखपूर मुख्यालय गीता प्रेसच्या सहकार्याने आरती संग्रहाच्या सुमारे 1 कोटी प्रती छापल्या आहेत. या आरती संग्रहात भगवान शिव, गणेश, विष्णू, दुर्गा-लक्ष्मी आणि इतर देवतांना समर्पित भजन किंवा आरत्या समाविष्ट आहेत. हा संग्रह महाकुंभमेळ्यात भाविकांना मोफत वाटण्यात येणार आहे.
महाकुंभाची सुरुवात पौर्णिमा स्नानाने होईलप्रयागराजमध्ये 13 जानेवारीला पौष पौर्णिमा स्नानाने महाकुंभ सुरू होईल. याशिवाय 15 जानेवारीला मकर संक्रांतीचे स्नान, 29 जानेवारीला मौनी अमावस्येचे शाही स्नान, तर 3 फेब्रुवारीला वसंत पंचमी स्नान आणि 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा स्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर या महाकुंभाची सांगता 26 फेब्रुवारी रोजी महा शिवरात्री स्नानाने होईल. यमुना, सरस्वती आणि गंगा नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी देश-विदेशातून भाविक प्रयागराज येथे येतात. प्रयागराज व्यतिरिक्त हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे कुंभाचे आयोजन केले जाते.