प्रयागराज - महाकुंभ मेळा हा छोट्या छोट्या व्यावसायिकांना कमाईची मोठी संधी घेऊन आला आहे. धार्मिक अध्यात्मिक क्षेत्र असो व्यवसायाचे, मेहनतीने उत्पन्नाची संधी सगळ्यांना दिली आहे. महाकुंभ मेळ्यात कमी गुंतवणुकीतून मोठी कमाई करण्यासाठी हजारो बेरोजगार तरूण वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. त्यातच आणखी एका युवकाचं उदाहरण समोर आले आहे. ज्यानं गर्लफ्रेंडची आयडिया ऐकून महाकुंभमध्ये व्यवसाय सुरू केला आणि ५ दिवसांत चांगली कमाई केली.
त्रिवेणी संगम किनारी टूथपिक्स विकताना नजरेस पडणाऱ्या युवकाला प्रश्न विचारला असता त्याने सांगितले की, मी दात स्वच्छ करण्यासाठी वापरणारी कडुलिंबाच्या काड्या विकतोय. आज माझा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत ३०-४० हजार कमाई केली आहे. कधीकधी रात्री अधिक विक्री होते. ९ ते १० हजार माल विकला जातो. जितकं जास्त मेहनत घेणार तितका अधिक फायदा होतो असं त्याने म्हटलं. आदर्श तिवारी नावाच्या इन्स्टाग्राम युवकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
विशेष म्हणजे या युवकाला ही बिझनेस आयडिया त्याच्या गर्लफ्रेंडनं दिल्याचं तो सांगतो. या कामासाठी एकही पैसा न गुंतवता सुरू करता येते. झाडापासून फुकट काड्या आणून विकायचे आणि चांगली कमाई होते. तिच्यामुळेच मी आज इतका कमवत आहे. तिच्यावर मी खूप प्रेम करतो. तिच्या आयडियामुळे मी पैसे कमवत आहे असं या तरूणाने सांगितले.
दरम्यान, १३ जानेवारीपासून प्रयागराज इथं सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये अनेक साधू संत, सेलिब्रिटी हजेरी लावत असून याठिकाणी व्हिडिओ व्हायरल होऊन रातोरात स्टार बनलेलेही अनेक आहेत. मग त्यात आयआयटीवाले बाबा असतील, माळ विकणारी मोनालिसा असेल, सुंदर दिसणारी हर्षा रिछारिया साध्वी असेल किंवा चहा, पाण्याची बोटल, अन्य छोट्या छोट्या गोष्टी विकणारे मुले असतील ते फेमस होत आहेत आणि चांगली कमाई करत आहेत.