Join us  

राजस्थानात उद्योजकांचा महामेळा; अदानी गुंतवणार ६५ हजार कोटी, ११ लाख जणांना रोजगाराची संधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 9:44 AM

राजस्थानमध्ये जगभरातील उद्योजकांचा महामेळा आयोजित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

जयपूर:राजस्थानमध्ये जगभरातील उद्योजकांचा महामेळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या राजस्थान गुंतवणूक शिखर परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात  जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले उद्योगपती गौतम अदानी यांनी राजस्थानात  ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. 

राजस्थानमध्ये पुढील पाच ते सात वर्षांत १० हजार मेगावॅट सौरऊर्जा क्षमतेची उभारणी, सिमेंट प्लांटचा विस्तार आणि जयपूर विमानतळाच्या सुधारणांसाठी अदानींनी ही गुंतवणूक केली आहे. यामुळे ४० हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनाही राजस्थानमध्ये सेमीकंडक्टर चिप उद्योग उभारण्यासाठी आमंत्रित केले. या उद्योग परिषदेमध्ये जगभरातील ३ हजारांपेक्षा अधिक उद्योगपती सहभागी झाले आहेत. या परिषदेत टाटा पॉवरने राजस्थानमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

सिमेंट क्षेत्रातही विस्तार

अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीच्या अधिग्रहणानंतर अदानी समूह आपली सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचा विचार करत आहे. गौतम अदानी म्हणाले की, राज्यात आमची सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्यासाठी आणखी ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कुठे गुंतवणूक करणार? 

अदानी म्हणाले की, अदानी समूहाने राजस्थानमध्ये आधीपासूनच चांगली गुंतवणूक केली आहे. अदानी समूह राजस्थानमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालवण्यासह सोलर पार्कची स्थापना आणि राज्याच्या वीज निर्मिती युनिट्सना कोळसा पुरवठा करतो. याशिवाय, अदानी समूह १० हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमतेसाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. पुढील ५ वर्षात हे प्रकल्प हळूहळू कार्यान्वित होतील. समूहाने अवघ्या आठवड्यापूर्वी राजस्थानमध्ये जगातील सर्वात मोठ्या पवन-सौर हायब्रिड ऊर्जा प्रकल्पाचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू केले.

...तर ११ लाख जणांना रोजगार

मुख्यमंत्री गेहलोत आणि उद्योग मंत्री शकुंतला रावत यांनी सीतापुरा येथील या परिषदेचे उद्घाटन केले. गुंतवणुकीचा करार प्रत्यक्षात आल्यानंतर राज्यात ११ लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळेल. मेळ्यापूर्वी १०.४४ लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांवर स्वाक्षरी झाली  आहे. 

राजस्थानने अनेक वर्षे दुष्काळाचा सामना केला. आता राज्य वेगाने प्रगती करत आहे. राज्यात कोणतेही सरकार असले तरी उद्योगांना गुंतवणूक करण्यासाठी विश्वासार्ह धोरणे, मजबूत पायाभूत सुविधा आणि उत्तम कायदा व सुव्यवस्थेसह आवश्यक ते सर्व काही मिळेल. त्यामुळे कंपन्यांनी राजस्थानमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे यावे.  - अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राजस्थानगौतम अदानीअदानीअशोक गहलोत