Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. ज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. अर्थसंकल्पाचे वाचन संपवताना अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेतून विरोधकांना खोचक टोला लगावला.
राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच अर्थसंकल्पात शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास अजित पवारांनी प्राधान्य दिले आहे, असे सांगितले जात आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रियांबाबत अजित पवार यांनी खोचक शब्दांत भाष्य केले.
उगाच टीका करू नका
हा अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतील. त्या ठरलेल्याच असतात, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अंतरिम अर्थसंकल्प, आणि तोही इतका चांगला मांडल्यानंतर, त्यांनी आपल्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा थोडा विचार करायला हवा. “प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे.. इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका.. भलेपणाचे कार्य उगवता, उगाच टीका करू नका”, अशा कवितेच्या ओळी वाचून दाखवत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करील, याची खात्री मी देतो, असे अजित पवारांनी सांगितले.
दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्पात केवळ आमची हे करण्याची तयारी आहे, ते करण्याचा विचार आहे, अशा सगळ्या गोष्टींपलीकडे महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काहीही दिसून आले नाही. महिला सक्षमीकरणाचा उल्लेख झाला पण ठोस उपाययोजना दिसलेल्या नाहीत. या बजेटबद्दल बोलायचे तर महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचे काम या सरकारकडून होत आहे हे आता सिद्ध झाले आहे. ही तीनही मंडळी मिळून जे काम करत आहेत, ते पाहता यांनी बाकी सगळ्या तरतूदी करून ठेवल्या आहेत. पक्षफोडीसाठी एखादी तरतूद करून ठेवतील असेही मला वाटले होते. तेवढीच एक तरतूद यांनी केली नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने यापेक्षा दुर्दैवी बजेट दुसरे असूनच शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारचा समाचार घेतला.