Join us

Maharashtra Budget 2018 : शेतमालाची आॅनलाइन विक्री, १४५ बाजार समित्या ‘ई-नाम’ला जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:53 AM

राज्यातील १४५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘ई-नाम’ या राष्ट्रीय कृषी पोर्टलशी जोडण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली. यामुळे शेतक-यांना उत्पादनांची आॅनलाइन विक्री करता येणार आहे.

मुंबई  - राज्यातील १४५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘ई-नाम’ या राष्ट्रीय कृषी पोर्टलशी जोडण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली. यामुळे शेतक-यांना उत्पादनांची आॅनलाइन विक्री करता येणार आहे.शेतमालाची आडतिया व दलालांशिवाय थेट आॅनलाइन विक्री करता यावी, यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) हे पोर्टल सुरू झाले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील २९५ पैकी केवळ ३० बाजार समित्यांमध्ये या पोर्टलच्या माध्यमातून ई-ट्रेडिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील वार्षिक उलाढाल ३७ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. अर्थसंकल्पीय घोषणेनंतर आता सर्वाधिक कृषी मालाची विक्री आॅनलाइन करणारे महाराष्ट्र देशातील अव्वल राज्य ठरू शकेल. या पोर्टलला संलग्न असलेल्या सध्या सर्वाधिक १०० बाजार समित्या उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर, हरयाणातील ५४ व मध्य प्रदेशातील ५० बाजार समित्यांचा समावेश आहे.८६ स्वाधारगृहांसाठी २० कोटीकेंद्र सरकारच्या नवीन स्वाधारगृह योजनेतील निकषांनुसार, राज्यातील ३३ अल्पमुदत निवासगृहे व ५३ स्वाधारगृहे एकत्रित करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या एकत्रित स्वाधारगृहांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.कुपोषण : २१.१९ कोटीकुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी २१.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील आदिवासी क्षेत्रातील १६ जिल्हे व बिगर आदिवासी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालक आणि ग्राम बालविकास केंद्रांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे.‘मन की बात’ची दखलअकोला शहरातील मोरणा नदीची सर्वसामान्य नागरिक व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत स्वच्छता केली. या मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये उल्लेख केला. त्याची दखल घेत, अर्थमंत्र्यांंनी राज्यातील सर्व जलस्रोतांच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी २७ कोटी रुपयांची तरतूद केली.

टॅग्स :महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८शेती क्षेत्र