Lokmat Money > बिझनेस न्यूज > Maharashtra Budget 2018 : सहा कौशल्य विद्यापीठे! आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ

Maharashtra Budget 2018 : सहा कौशल्य विद्यापीठे! आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ

राज्यातील २० लाख आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी पाऊल म्हणून सहा कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापना खासगी सहभागातून करण्यात येणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना, अनेक लोकाभिमुख योजनांची घोषणा केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:15 AM2018-03-10T03:15:31+5:302018-03-10T03:15:31+5:30

राज्यातील २० लाख आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी पाऊल म्हणून सहा कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापना खासगी सहभागातून करण्यात येणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना, अनेक लोकाभिमुख योजनांची घोषणा केली.

Maharashtra Budget 2018: Six Skills University! Welfare Board for autorickshaw drivers | Maharashtra Budget 2018 : सहा कौशल्य विद्यापीठे! आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ

Maharashtra Budget 2018 : सहा कौशल्य विद्यापीठे! आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ

- विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील २० लाख आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी पाऊल म्हणून सहा कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापना खासगी सहभागातून करण्यात येणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना, अनेक लोकाभिमुख योजनांची घोषणा केली.
महाराष्ट्र राज्य आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून आॅटोचालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या महामंडळासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
परदेशात रोजगार व शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी परदेश रोजगार व कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाकरिता प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र उभारण्यात येणार असून, चालू वर्षी त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे प्रवाशांची ने-आण करणारी एसटीची बस आता मालवाहतूकदेखील करणार आहे. कृषी मालासह अन्य नाशवंत वस्तूंची वाहतूक त्यामुळे किफायतशीर दरामध्ये होणार आहे. आतापर्यंत शहरांपुरतीच मर्यादित असलेली सांडपाणी प्रक्रिया ही संकल्पना आता ग्रामीण भागातही राबविली जाणार आहे. त्यासाठी ३३५ कोटी रुपयांची तरतूद असलेली मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन योजना जाहीर करण्यात आली. २१० शहरांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी १ हजार ५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात न्यायालयांच्या इमारती, न्यायाधीशांची निवासस्थाने उभारण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

जयंत पाटील यांना बोलू दिले नाही
माजी अर्थमंत्री जयंत पाटील मुनगंटीवार यांचे भाषण सुरू असताना मध्येच बोलायला उभे राहिले. तेव्हा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘आता मध्येच काय बोलायचे आहे?’ असे विचारले. ‘मलाही शेर ऐकवायचे आहेत,’ असे जयंत पाटील म्हणाले. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आरडाओरड करीत त्यांना बोलू दिले नाही. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले, जयंतराव तुमची अर्थसंकल्पावरची नऊ भाषणं मी ऐकली आहेत. पाहिजे तर ती तुम्हाला भेट म्हणून पाठवितो. तुम्ही जर शेर ऐकविला तर मीही शेर ऐकवेन. मग मात्र तुम्हाला आपण का बोललो याचा पश्चाताप होईल.’ त्यानंतर, अजित पवार यांनी जयंत पाटील यांना खाली बसविले.

विरोधकांकडून सत्ताधा-यांना आव्हान
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करीत असताना कर्जमाफीचा विषय आला. या योजनेची माहिती वित्तमंत्री वाचू लागले, तेव्हा सत्ताधारी बाकावरून त्याला कसलाही प्रतिसाद नव्हता.
तेव्हा विरोधकांकडून ‘आता तरी बाके वाजवा’ असे आव्हान दिले जाऊ लागले. या योजनेंतर्गत १३,७८२ कोटी रुपये शेतकºयांना दिले गेले, असे वित्तमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर सत्ताधाºयांनी बाके वाजवली. अर्थमंत्र्यांच्या भाषणांच्या वेळी सत्ताधारी बाकावरून म्हणावा तसा उत्साही प्रतिसाद दिसत नव्हता. तर विरोधी बाकावरूनदेखील फारसा विरोध सभागृहात झाला नाही.

350 मानव विकास निर्देशांकासाठी
राज्यातील १२ अतिमागास जिल्ह्यातील १२५ तालुक्यांमध्ये मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन रूम टू रेड्युस पॉव्हर्टी’ हा नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून, याद्वारे पहिल्या टप्प्यात १२५ पैकी २७ तालुक्यांचा मानव विकास निर्देशांत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून वित्तमंत्री म्हणाले, २0१८-१९ या वर्षात ३५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सातारा येथील श्री शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या बांधकाम व सुशोभीकरणासाठी
५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


कर्जाची राज्य उत्पन्नाशी टक्केवारी वाढली
२0१३-१४ या वर्षात काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार पायउतार झाले, तेव्हा राज्याच्या उत्पन्नाशी कर्जाची प्रमाण १६.३ टक्के होते. त्यानंतर, भाजपा- शिवसेनेचे सरकार आले. आता २0१७-१८ मध्ये हे प्रमाण १६.६ टक्के झाले. महसुली जमेशी व्याजाची टक्केवारी पाहिली, तर २0१३-१४ मध्ये हे प्रमाण १४.१५ टक्के होते, तर १७-१८ मध्ये ते १३.१ झाले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम सुरू
आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा रस्ता बांधण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यासाठी १७,८४३ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी कामांना गती देण्यात आली असून, एका धावपट्टीचे काम डिसेंबर २0१९पर्यंत पूर्ण होणार आहे.

उपनगरीय रेल्वे सुधारणा मेट्रो विकास,
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगून, राज्यातील न्यायालयीन इमारतींसाठी व न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी ७00.६५ कोटी एवढी मोठी तरतूद पहिल्यांदाच करण्यात आल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

जकातीचे व सरकारचे उत्पन्न घटले
राज्य सरकारला २0१६-१७ मध्ये जकाती पोटी ४६४१.५३ कोटी रूपये मिळाले होते. २0१७-१८ मध्ये हे उत्पन्न अर्ध्यावर आले. या वर्षात सरकारला जकातीपोटी २७४0.७२ कोटी रुपये मिळाले. असा मोठा फटका सरकारला केंद्रीय उत्पादन शुल्कात बसला.
२0१६-१७ मध्ये ५३00.२३ कोटी रुपये उत्पादन शुल्कापोटी मिळाले, ते २0१७-१८ मध्ये २८३८.९३ कोटी झाले. सेवाकरातही मोठा फटका बसला. २0१६-१७ मध्ये ५४९८.९२ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. २0१७-१८ मध्ये ते १७३१.७७ कोटींवर येऊन थांबले.

कृषी स्मार्ट सिटीसाठी
१,३१६ कोटी : पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद व पिंपरी चिंचवड या आठ शहरांची स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात १ हजार ३१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी
रस्ते विकास १०८२८ कोटी
ऊर्जेच्या पायाभूत सुविधा ७२३५ कोटी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २२५५ कोटी
सामाजिक न्याय विभाग ९९४९ कोटी
आदिवासी विकास विभाग ८९६९ कोटी

रामटेकसाठी २५ कोटी : धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यातील २५ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अर्थमंत्र्यांचे काव्यवाचन

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात वेगवेगळ्या योजना जाहीर करताना कवितांच्या ओळी सादर केल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासाठी धनगरवाडीत सभागृह बांधण्याची तरतूद केली...

होळकरांचा मानबिंदू, तिने गाजविला भूलोक
आदराने आम्ही म्हणतो, सारे तिला पुण्यश्लोक
स्मृती जपोनी त्या तेजाची, लिहू या कीर्तिगाथा
विनम्रतेने त्यांच्या चरणी, झुके मराठी माथा...!

बेरोजगार तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकास कार्यक्रम अर्थमंत्र्यांनी जाहीर केला. त्या वेळी बोलताना ते म्हणाले -
नसो कुणाच्या चेहºयावरती दु:खाचा अंधार
अन् तरुणांच्या खांद्यावरती बेकारीचा भार
कौशल्याचा विकास देईल रोजगाराची हमी
मिळेल साºयांच्या स्वप्नांना हक्काचा आधार...!

अर्थसंकल्प संपविताना व भाषणाचा समारोप करताना अर्थमंत्री म्हणाले-
हे बजेट माझे सदैव देईल, सामान्यांना साथ
कधी ना सोडू कष्टकºयांचा, आपुलकीचा हात
विकास अन् प्रगतीची आम्ही, घुमवू जगात ग्वाही
हे कामच आमुचे इथले, देईल तुम्हाला ग्वाही...!

लयुक्त शिवार, विहीर आणि मागेल त्याला शेततळे यासंबंधीची घोषणा करताना म्हणाले-
शेतकरी हा कणा आमुचा, हित तयाचे पाहू
अडीअडचणी कितीही येवो, सोबत त्याच्या राहू
विहिरी देऊ, सिंचन देऊ,
देऊ शेततळी
वचन आमुचे प्राणपणाने,
हे नाते कायम निभवू...!

शेरोशायरीचाही आधार...
आईना देख लें जो हमसे पूछते सवाल
जो फालतु की बातों के जबाब माँगते है,
रोटी पचा गये जो, गरीबोंके हिस्से की
वे हमसे जाने कौनसा हिसाब माँगते है।

पुढे विरोधकांनी विकासाच्या कामात अडथळे आणण्याचे काम करू नये. चांगल्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे सांगताना ते म्हणाले-
सदियोंसे था विपक्ष के चंगुल में जो विकास
उसको छुडाके हमने आझाद कर दिया,
वे क्या करेंगे हमसे भला अब मुकाबला
जिनके चलन ने देश को बरबाद कर दिया

आम्ही जनतेचे सेवक आहोत तुमच्यासारखे नाही. आमच्या मनात सेवेचा भाव आहे, असे म्हणत अर्थमंत्र्यांनी आणखी एक शेर विरोधकांच्या दिशेने सोडला. तो असा-
हम जनता के सेवक है, विकास की बयार लायें है
सुखे से दरकती धरती पर, जलयुक्त शिवार लायें है...
सेवा का प्रण दिल मे है, परिवर्तन का ज्वार लायें है
सबका साथ सबका विकास कर महाराष्ट्र को उबार लायें है...

त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सणसणीत उत्तर दिले ते असे - आत्महत्याओंका ज्वार लायें है, जनता का घात, मंत्रियोंका विकास किए है
ये तो महाराष्ट्र को डुबा रहे है...

Web Title: Maharashtra Budget 2018: Six Skills University! Welfare Board for autorickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.