Join us

Maharashtra Budget 2025 Live Updates: शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प, विरोधकांची टीका

By जयदीप दाभोळकर | Updated: March 10, 2025 15:30 IST

Maharashtra Budget 2025 Live Updates: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री  अजित पवार हे आज राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. ‘ महाराष्ट्र ...

10 Mar, 25 03:25 PM

अर्थसंकल्प निराशाजनक, कोणत्याही योजना नाही; विरोधकांची टीका

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर विरोधकांनी यावर टीका केली. संपूर्ण बजेट पूर्णपणे निराशाजनक आहे. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. कोणत्याही योजना नाही, तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका विरोधकांनी केली.

10 Mar, 25 03:21 PM

राज्याचे सार्वजनिक आरोग्य धोरण आखण्यात येणा

राज्याचे सार्वजनिक आरोग्य धोरण आखण्यात येणार असून प्रत्येक व्यक्तीला ५ किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरणं आणि अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत स्मार्ट पीडीएस आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे.

10 Mar, 25 03:12 PM

कर महसूलाचे उद्दिष्ट्य ३ लाख ६७ हजार कोटी.

कर महसूलाचे उद्दिष्ट्य ३ लाख ६७ हजार कोटी. वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यात येण्यापूर्वी राज्य कर विभगातर्फे राबण्यात आलेल्या विविध कायद्यांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेल्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अभय योजनेची सुरुवात केली जाणार आहे. याचं नाव महाराष्ट्र कर व्याज किंवा विलंब शुक्ल असं असेल. याचा कालवधी लागू झाल्यापासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असेल.

10 Mar, 25 03:07 PM

३ ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात सन्मान दिन साजरा केला जाणार

मराठी भाषा विभागाला २२५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित. ३ ऑक्टोबरला मराठी भाषा अभिजात सन्मान दिन साजरा केला जाणार

10 Mar, 25 03:03 PM

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. याशिवाय पानिपत येथे मराठा शौर्याचं यथायोग्य स्मारक उभारलं जाईल. तर आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले.

10 Mar, 25 02:59 PM

पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारण्यात येणार

पुण्यात दुसऱ्या टप्प्यात २ मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहेत. नळ स्टॉर- वारजे असा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार. दुसऱ्या टप्प्यातील दोन मेट्रो मार्गांसाठी ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव आहे. पुण्याच्या दोन मेट्रो मार्गांचा ्प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय.

10 Mar, 25 02:57 PM

ठाण्यात २०० खाटांचं, रत्‍नागिरी जिल्ह्यात १०० खाटांचं संदर्भ सेवा रुग्‍णालय

ठाण्यात २०० खाटांचं, रत्‍नागिरी जिल्ह्यात १०० खाटांचं संदर्भ सेवा रुग्‍णालय आणि रायगड जिल्ह्यात २०० खाटांचं अतिविशेषोपचार रुग्‍णालय उभारण्यात येणार. स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात वाढ करण्यात येणार.

10 Mar, 25 02:55 PM

लाडकी बहीणसाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च

लाडकी बहीणसाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. यासाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. बचत गटांच्या उत्पादनासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल असेल.  पहिल्या टप्प्यात १० उमेद मॉल उभे करणार.

10 Mar, 25 02:52 PM

लेक लाडकी योजनेंतर्गत १ लाख १३ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ

लेक लाडकी योजनेंतर्गत १ लाख १३ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आलाय. २०२५-२६ साठी या योजनेसाठी ५०.५५ लाख रुपयांच्या निधी प्रस्तावित. मुलींच्या व्यवसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या १०० टक्के प्रतीपूर्तीसाठी करण्यात येत आहे.

10 Mar, 25 02:49 PM

अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ

अनुसुचित जाती घटक कार्यक्रमाच्या तरतुदीत ४२ टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. याशिवाय आदिवासी घटक कार्यक्रमाच्या यादीत ४० टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. धनगर, गोवारी समाजासाठी २२ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या.

10 Mar, 25 02:46 PM

आवास योजनेतील लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येणार

राज्यात पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. आवास योजनेतील लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येणारे. राज्यासाठी नवं गृहनिर्माण धोरण राबवण्यात येणार. पंतप्रधान सूर्यघर योजनेतून १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांनी ५०० मेगावॅट पेक्षा अधिक क्षमतेचे सौर ऊर्जासंच स्थापित केलेत. १ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदानाचा लाभ देण्यात आलाय.

10 Mar, 25 02:41 PM

कृषी विभागासाठी ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद

कृषी विभागासाठी ९ हजार ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. अन्न व नागरी पुरवठा विभागाला ५२६ कोटींची तरतूद. जलसंधारण विभागाला ४ हजार २४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.

10 Mar, 25 02:39 PM

एक तालुका, एक बाजार समिती योजना राज्यभर राबवली जाणार

मुंबई, नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन केली जाईल. याशिवाय एक तालुका, एक बाजार समिती योजना राज्यभर राबवली जाणार आहे.

10 Mar, 25 02:38 PM

मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक जलद होण्यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आलेत. ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजित. ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

10 Mar, 25 02:34 PM

नळगंगा ते वैनगंगा प्रकल्पाचा लाभ विदर्भातील सहा जिल्ह्यांना होणार

नार-पार नदीजोड प्रकल्पाला गती देण्यात येईल. नदीजोड प्रकल्पाचा नागपूरसह सहा जिल्ह्यांना लाभ मिळेल. नळगंगा ते वैनगंगा प्रकल्पाचा लाभ विदर्भातील सहा जिल्ह्यांना होणार.

10 Mar, 25 02:32 PM

कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार

कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार आहे. याशिवाय शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जलयुक्त शिवार २.० च्या टप्प्यातील कामं मार्गी लागणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले.

10 Mar, 25 02:31 PM

परिवहन विभागाला ३६१० कोटींचा निधी प्रस्तावित.

परिवहन विभागाला ३६१० कोटींचा निधी प्रस्तावित. मुंबईत ४१ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

10 Mar, 25 02:27 PM

२५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारणार

नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी तलंच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

10 Mar, 25 02:27 PM

नवी मुंबई विमानतळाचं ८५ टक्के काम पूर्ण

नवी मुंबई विमानतळाचं ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे. नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाचं काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग होणार.

10 Mar, 25 02:26 PM

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प प्रस्तावित. ययाशिवाय पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणाले.  तर तळेगाव ते चाकण उन्नत मार्गाचं काम प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं.

10 Mar, 25 02:24 PM

राज्यातील वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होणार

राज्यातील वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होणार. एमएमआर क्षेत्र ग्रोत सेंटर म्हणून विकसित केलं जाणार. याशिवाय शक्तिपीठ महामार्गांच्या भूसंपादनाचं काम प्रगतीपथावर असल्याचंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं.

10 Mar, 25 02:21 PM

वाढवण बंदराजवळ तिसरं विमानतळ प्रस्तावित

वाढवण बंदर जेएनपीटीच्या तिप्पट असेल. वाढवण बंदराजवळ तिसरं विमानतळ प्रस्तावित असल्याचं अजित पवार म्हणाले.

10 Mar, 25 02:20 PM

अमृतकाल रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित

सिंधुदुर्गात देवबाग येथे सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प  सुरू करण्यात येणार आहे. रस्ते विकास प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण झाल्याचं अजित पवार म्हणाले. याशिवाय अमृतकाल रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित असल्याचंही त्यांनी म्हटलं,

10 Mar, 25 02:18 PM

२०३० पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य

७६ हजार कोटींचं वाढवण बंदर, राज्याचा वाटा २६ टक्के. पर्यटनाला बंदर करातून सूट देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. २०३० पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य असल्याचं ते म्हणाले.

10 Mar, 25 02:15 PM

महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना होणार

१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. बंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरसाठी भूसंपादनाचं काम सुरू. यामुळे राज्यातील अवर्षण प्रवण भागात उद्योगांची स्थापना होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळेल. राज्याला तांत्रिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना होणार.

10 Mar, 25 02:12 PM

राज्याचं नवं औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार - अजित पवार

राज्याचं नवं औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीत ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल. यासोबत आकाश व संरक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, सूक्ष-लघू-मध्यम उपक्रम धोरण, चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

10 Mar, 25 02:07 PM

महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही - अजित पवार

महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वाढ होत असल्याचे अजित पवार म्हणाले.

10 Mar, 25 02:06 PM

लाडक्या बहीणी मिळाल्या म्हणून आम्ही धन्य झालो - अजित पवार

विकासाची कामं केली म्हणून आम्ही परत आलो. लाडक्या बहीणी मिळाल्या म्हणून आम्ही धन्य झालो.

10 Mar, 25 01:50 PM

अर्थसंकल्पापूर्वी दादा भूसेंचं महत्त्वाच वक्तव्य

अर्थसंकल्पापूर्वी दादा भुसेयांनी अर्थसंकल्पामध्ये कोणत्या गोष्टी असतील यावर भाष्य केलं. ‘इतरांची रेश छोटी करण्यापेक्षा आपली मोठी करा. मतदारांची यादी सरकारकडून तयार केली जात आहे. सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असं भुसे म्हणाले. सर्व घटकांना समावून घेणारा हा अर्थसंकल्प असणार असल्याचे ते म्हणाले. 

10 Mar, 25 01:31 PM

अर्थमंत्री विधानभवनात दाखल

राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल

.

10 Mar, 25 01:25 PM

महाराष्ट्राचा वृद्धिदर केंद्रापेक्षा जास्त

२०२३-२४ मध्ये एकूण अर्थव्यवस्था वृद्धीचा दर ७.६ टक्के होता, तो चालू आर्थिक वर्षात ७.३ इतका असेल असे अपेक्षित आहे. २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय विकासाचा वृद्धिदर ६.५ अपेक्षित असून महाराष्ट्राची सरासरी त्यापेक्षा चांगली आहे. 

10 Mar, 25 01:10 PM

सुविधांवरील सरकारच्या खर्चात वाढ

राज्याचा २०२४-२५ चा महसुली खर्च ५,१९,५१४ कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. हा खर्च २०२३-२४ च्या सुधारित खर्चाच्या तुलनेत अधिक असेल. शालेय शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांवरील सरकारच्या खर्चात वाढ झाली आहे. 

10 Mar, 25 12:37 PM

कृषीत चांगली कामगिरी

चालू वर्षी राज्याच्या बहुतेक भागात चांगला पाऊस पडला. परिणामत: कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासाचा दर ८.७ टक्के इतका असेल. केवळ चांगला पाऊसच नाही तर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर हेही त्यामागील कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.

10 Mar, 25 12:20 PM

आर्थिक पाहणी अहवालात काय?

विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राचा एकूण विकासाचा वृद्धिदर २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये किंचित घसरलाय. मात्र, राष्ट्रीय दरापेक्षा तो अधिक आहे. कृषी क्षेत्रातील विकासात महाराष्ट्रानं अत्यंत दमदार कामगिरी केलीये, पण उद्योग क्षेत्र माघारलं. 

10 Mar, 25 11:32 AM

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर (१३ वेळा) दुसरे सर्वाधिक (११) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (१० वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (९ वेळा) यांना जातो.

10 Mar, 25 11:09 AM

३१ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

गतवर्षीच्या तुलनेत राज्य सरकारच्या उत्पन्नातदेखील सुमारे १० टक्के वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्राचं दरडोई सरासरी उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपयांवरून तीन लाख पार करत आहे. देशात येत असलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत आहे.

10 Mar, 25 10:54 AM

कर्जाचा बोजा वाढला

२०२३-२४ मध्ये राज्यावरील कर्जाचा बोजा ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपये होता, २०२४-२५ या आर्थिक वर्षात त्यात १० टक्के वाढ होऊन तो ७ लाख ८२ हजार ९९१ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

10 Mar, 25 10:37 AM

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार का? 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकार सध्या दरमहा लाडक्या बहिणींना १५०० रुपये देते. विधानसभा निवडणुकीत ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिलं होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात यासंदर्भात वित्तमंत्री घोषणा करणार का याकडे लक्ष आहे.

10 Mar, 25 10:36 AM

दरवर्षी कर्ज सरासरी ९.९२% दरानं वाढलं

जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या ९६,००० कोटींच्या योजनांमुळे २०२४-२५ च्या अखेरीस वित्तीय तूट १.१० लाख कोटींच्या घरात असेल असा अंदाज होता. मात्र पावसाळी अधिवेशनातील ९४,६१० कोटींच्या पुरवणी मागण्या, चालू २०१८-१९ ते २०२२-२३ दरम्यान दरवर्षी कर्ज सरासरी ९.९२% दरानं वाढलं. 

10 Mar, 25 10:09 AM

वाढत्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रणाचं आव्हान

विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस विजय मिळवून देण्यात सरकारनं दिलेल्या मोफत योजनांचा मोलाचा वाटा आहे. मात्र यामुळे आधीच महसुली तूट असलेल्या राज्याच्या तिजोरीवर आणखी भार पडला आहे. त्यामुळे सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना वाढता खर्च, महसुली तूट, राज्यावरील वाढते कर्ज, देणी आणि वाढत्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण याचं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असणार आहे.

10 Mar, 25 10:04 AM

अजित पवार अकराव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आज राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.

टॅग्स :अजित पवारदेवेंद्र फडणवीसअर्थसंकल्प 2024महाराष्ट्र बजेट 2025महाराष्ट्रमहाराष्ट्र सरकार