Join us  

मुलीच्या जन्मानंतर महाराष्ट्र सरकार देतंय ५० हजार; जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती, काय आहेत अटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:27 AM

पाहा काय आहे ही योजना आणि कसा करता येईल अर्ज.

Majhi Kanya Bhagyashree Yojana: केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारही देशातील मुलींच्या हितासाठी अनेक योजना राबवतात. या योजनांचा उद्देश मुलींची संख्या वाढवणं आणि त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याचा आहे. महाराष्ट्रातही मुलींसाठी एक सरकारनं एक उत्तम योजना सुरू आहे. माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत तुमच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर तुम्हाला राज्य सरकारकडून ५० हजार रुपये दिले जातात. परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana) १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनानं सुरू केली होती. मुलींची संख्या वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत दुसरी मुलगी असली तरी सरकार पैसे देते. केवळ महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पूर्ण कराव्या लागतील या अटीया योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर १ वर्षाच्या आत नसबंदी केली तर त्या मुलीच्या नावावर शासनाकडून ५० हजार रुपयांची रक्कम बँकेत जमा केली जाते. या योजनेंतर्गत दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजनाचा निर्णय घेतला असेल तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे २५०००-२५००० रुपये बँकेत जमा केले जातील.

योजनेअंतर्गत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ती पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र असेल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान १० वी उत्तीर्ण आणि अविवाहित असणं आवश्यक आहे.

मिळतो १ लाखांचा विमामाझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावानं बँकेत संयुक्त खातं उघडलं जातं. यावर १ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे.

ही कागदपत्रे आवश्यकया योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणं आवश्यक आहे. यासोबतच आई किंवा मुलीचं बँक खात्याचे पासबुक, मोबाईल फोन नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रहिवासी पुरावा आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही द्यावा लागेल.

कुठे कराल नोंदणीमाझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म पूर्णपणे भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जमा करा. तपासाअंती तुमचा अर्ज योग्य आढळल्यास सरकार तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे देईल.

टॅग्स :महाराष्ट्रसरकार