यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथे बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक असलेला ३९ लाख टन क्षमतेचा सिमेंट प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत. हा प्रकल्प नेमका कसा आहे, तो का उभारला जात आहे, कंपनीच्या नेमक्या योजना काय आहेत, याविषयी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ अरविंद पाठक यांनी ‘लोकमत’ला दिलेली मुलाखत...
प्रश्न : हा प्रकल्प समूहास का उभारावासा वाटला?
उत्तर : आमच्यासाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. आम्ही महाराष्ट्राला चांगले जाणतो. आम्ही अधिग्रहित केलेल्या रिलायन्स सिमेंट कंपनी प्रा. लि., चा बुटीबोरी येथे आधीच एक प्रकल्प होता. म्हणजेच आम्ही ८-१० वर्षांपासून येथे सिमेंट उत्पादन क्षेत्रात आहोत. आम्हाला राज्याच्या गरजा चांगल्याप्रकारे माहीत आहेत. महाराष्ट्रात मागील १६ वर्षांपासून नवीन प्रकल्प आलेला नाही. म्हणून आम्ही मुकुटबन येथे अत्याधुनिक व मोठा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
सध्या या प्रकल्पाची स्थिती काय आहे?
बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडची स्वत:ची अंतर्गत गुणवत्ता मानके आहेत. आम्ही आमच्या उत्पादनांचे अंतर्गत मार्केट सॅम्पलिंग आणि समीक्षा करतो. प्रकल्प आधीच पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आम्ही येथे सिमेंटच्या तीन-चार व्हरायटी बनवू इच्छितो. त्यासाठी वेगवगळ्या कालावधीच्या चाचण्या करण्यात येतात. उत्पादने अधिक उत्तम करण्यात येत आहेत.
या प्रकल्पातून कोणत्या भागात सेवा दिली जाणार आहे.
वास्तविक हा प्रकल्प पूर्णत: महाराष्ट्रासाठीच आहे. तथापि, प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी गरज पडलीच, तर मध्यप्रदेशातील छिंदवाडासारख्या भागात तसेच तेलंगणाच्या काही भागात सिमेंट पाठविले जाऊ शकते.
तुम्ही विस्ताराची काही योजना आखली आहे का?
आमचा समूह जेथे कोठे पाऊल ठेवतो, तेथे विस्ताराची तरतूद १०० टक्के असतेच. महाराष्ट्राबाबतही तेच धोरण आहे. प्रत्यक्ष विस्तार हा पुरवठा व मागणीच्या समीकरणानुसार ठरतो. आम्ही बाजार हिस्सा तयार करू तेव्हा विस्ताराचाही विचार करू.
सीएसआर पुढाकाराबद्दल काय सांगाल?
प्रकल्प मोठा आहे. कित्येक तास त्याच्या उभारणीसाठी लागले. एकही प्राण न गमावता आम्ही हे उभे करू शकलो. त्यामागे आम्ही घेतलेली सुरक्षाविषयक काळजी हे कारण आहे. कोरोना काळात आम्ही आमची स्वत:ची आरोग्य सुविधा उभी केली.
कंपनीचे एमडी म्हणून तुम्ही कर्मचाऱ्यांना कशी प्रेरणा देता?
संस्था जेथे होती, तेथून ती रूपांतरित होत आली आहे. रूपांतरणाची प्रक्रिया सुरूच आहे. मी या प्रक्रियेला थोडीशी जरी गती देऊन पुढे नेऊ शकलो, तरच मी माझा ठसा उमटवू शकेन. हाच विचार मला सतत प्रेरणा देत राहतो. मी निवृत्त झाल्यानंतर माझ्या नातवास सांगू शकेन की, मी हे-हे केले.
महाराष्ट्रात कोणत्या संधी आणि लाभ आहेत?
महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठ्या बाजारांपैकी एक आहे. मुंबई, नागपूर पुणे आदी अनेक शहरांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. याशिवाय नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी यांसारख्या शहरांतही मोठ्या प्रमाणात संधी आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्र हे जोखीम भरून काढणारे राज्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सतत वृद्धी देणारे ठिकाण आहे.
कामामुळे लाेकांची मने जिंकली...
नागरिकांकडून प्रकल्पात कुठलाही अडथळा आला नाही. मोठ्या प्रकल्पांत जमीन अधिग्रहणापासूनच समस्या निर्माण होतात. स्थानिक महत्त्वाकांक्षा व कंपन्यांची वचने यात दरी निर्माण होत असते; पण येथे असे काहीही घडले नाही. आम्ही येथील सर्व समस्यांवर मात केली. आमच्या सीएसआर कार्याने लोकांची मने जिंकली. त्यातून संवादाचे मार्ग खुले झाले.