Join us

केळीच्या निर्यातीत  महाराष्ट्र देशात आघाडीवर, ३४२ कोटींची उलाढाल; जळगाव अग्रेसर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 4:22 AM

banana exports : सन २०१९-२० मध्ये देशातून १ लाख ९५ हजार ७४६ टन केळीची, ६५८ कोटी रूपयांची निर्यात झाली. त्यातला महाराष्ट्राचा वाटा १ लाख ८ हजार ९६० टनांचा, ४२८ कोटी रूपयांचा होता.

- राजू इनामदार

पुणे : देशातील केळीच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. डिसेंबर २०२० पर्यंत झालेल्या केळीच्या ४७० कोटी रुपयांच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ३४२ कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे.सन २०१९-२० मध्ये देशातून १ लाख ९५ हजार ७४६ टन केळीची, ६५८ कोटी रूपयांची निर्यात झाली. त्यातला महाराष्ट्राचा वाटा १ लाख ८ हजार ९६० टनांचा, ४२८ कोटी रूपयांचा होता. केरळ (२४ हजार ७९ टन), तमिळनाडू (७ हजार ४५७) उत्तर प्रदेश (३७ हजार ४६९) कर्नाटक (१ हजार ५४६), बिहार (३ हजार १७२), गुजरात (१२७ टन), उत्तराखंड (३१० टन) या राज्यांपेक्षा महाराष्ट्र केळी उत्पादनात बराच पुढे आहे.राज्यातील केळीचे क्षेत्र ८० हजार हेक्टर आहे. त्यातील सर्वात जास्त म्हणजे ४८ हजार हेक्टर जळगावमध्ये आहे. जी-९ (ग्रँड नाईन) या वाणाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यालाच परदेशातून सातत्याने मागणी असते. केळीच्या निर्यातीतून इतके परकीय चलन मिळत असतानाही केंद्रीय कृषी विभागाचे केळीकडे अद्याप लक्ष नाही. ॲपेडा या निर्यात प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संस्थेने द्राक्षांसाठी ग्रेपनेट, आंब्यासाठी मँगोनेट अशा नावाने संकेतस्थळे विकसित केली आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर सर्वच माहिती विनामूल्य दिली जाते. 

टॅग्स :व्यवसाय