Join us

Maharashtra Lockdown : दुसऱ्या वर्षीही गुढीपाडव्याला, सुवर्णबाजारावर लॉकडाऊनचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:42 AM

Maharashtra Lockdown: कोरोनामुळे सहा दिवसांपासून सुवर्णपेढ्या बंद आहेत. गुढीपाडव्यालाही  बंदच राहणार आहे. सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षयतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाच्या काळात सुवर्णपेढ्या बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण व्यवसाय  ठप्प होत आहे. खरेदीचा हा सुवर्ण मुहूर्तदेखील हुकणार असून यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प होण्यासह ग्राहक, व्यावसायिक व कारागीर यांचाही हिरमोड होत आहे.कोरोनामुळे सहा दिवसांपासून सुवर्णपेढ्या बंद आहेत. गुढीपाडव्यालाही  बंदच राहणार आहे. सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षयतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. त्यात मराठी नववर्षाची सुरुवात असल्याने या मुहूर्तावर बहुतांश ग्राहक सोने-चांदी खरेदी करतात. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोना संसर्गामुळे विविध व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यात आता सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याला सुवर्ण खरेदीचा मुहूर्त हुकत आहे. याची व्यावसायिकांनाही झळ सहन करावी लागत असून या ठिकाणी काम करणाऱ्या मजूर, कारागीर यांच्यावरही परिणाम होत आहे.गेल्या वर्षभरात अनेक दिवस सुवर्णबाजार बंद राहिल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण पेढ्या बंद राहत आहेत.  या दिवशी सुवर्ण खरेदीला मोठे महत्त्व असून ग्राहकांचा हिरमोड होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ती ठप्प झाली आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.

टॅग्स :सोनंमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस