Join us  

देशातील सर्वाधिक श्रीमंत महाराष्ट्रात, अब्जाधिशांच्या यादीत 4 था आहे गुजरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 5:08 PM

गुजरातमध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे नाव प्रथम स्थानावर आहे.

अहमदाबाद - देशातील औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीत गुजरातचे नाव अभिमानाने घेतले जाते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियासाठीही गुजरातकडून योगदान देण्यात येत आहे. याच गुजरातमध्ये तब्बल 58 जणांकडे 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे समोर आले आहे. बार्कलेज हुरुन इंडिया रिच लिस्ट 2018 नुसार, या अब्जाधीश गुजरातींची एकूण संपत्ती 2.54 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. पण, या यादीत 272 अब्जाधिशांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.  

देशातील सर्वात श्रीमंत लोकांसह अब्जाधिश लोकांच्या यादीतही गुजरात चौथ्या स्थानावर आहे. महाराष्ट्र 272 लोकांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर दिल्ली असून दिल्लीत 163 अब्जाधीश लोक आहेत. तर, कुमारस्वामी यांच्या कर्नाटकात 72 अब्जाधिश आहेत. देशाचा विचार केल्यास, भारतात 831 लोकांकडे 1000 कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. त्यामध्ये सर्वात श्रीमंत म्हणून मुकेश अंबानी यांचे नाव आघाडीवर आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 3.71 लाख कोटी रुपये आहे.

गुजरातमध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे नाव प्रथम स्थानावर आहे. अदानींची वैयक्तिक संपत्ती 71,200 कोटी रुपये आहे. तरीही, देशातील श्रीमंतांच्या यादीत अदानी यांचा आठवा क्रमांक लागतो. गुजरात राज्यातील 84 टक्के अब्जाधिश अहमदाबाद येथे राहतात. अहमबादमध्ये 49 अब्जाधिश आहेत. तर, राजकोटमध्ये 5 टक्के, सूरतमध्ये 3 टक्के आणि वडोदरामध्ये 1 टक्के अब्जाधिश लोक आहेत. विशेष म्हणजे गुजरातच्या 58 अब्जाधिशांच्या यादीत 10 महिलांचा समावेश आहे. या महिला निरमा ग्रुप, टोरंट ग्रुप आणि इंस्टास फार्मा ग्रुपशी संबंधित आहेत. 

टॅग्स :मुकेश अंबानीमहाराष्ट्रगुजरात