नवी दिल्ली : गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी महिलांसाठी विशेष बचत योजना आणली होती. या योजनेत महिलांना सामान्यपेक्षा जास्त व्याज म्हणजेच चांगला परतावा दिला जात होता. आता सरकारकडून ही योजना बंद होण्याची शक्यता आहे.
2023-24 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या विशेष बचत योजनेचे नाव 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजना असे आहे. सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दोन वर्षांसाठी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे केंद्र सरकार मार्च 2025 नंतर ही योजना पुढे लागू करणार नसल्याचे म्हटले जात आहे.
'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजनेत महिलांना इतर अल्पबचत योजनांच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. या योजनेवर सरकार 7.5 टक्के आकर्षक व्याज देते. या योजनेचा लाभ फक्त एक महिला किंवा मुलगी घेऊ शकतात, ज्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी ठेवली जाते. सरकारने ही योजना एका वेळेसाठी आणली होती, जी 2 वर्षांसाठी राहणार होती. अशा परिस्थितीत ही योजना फक्त एप्रिल 2023 ते मार्च 2025 पर्यंत वैध आहे. सध्या तरी ही योजना पुढे नेण्याबाबत सरकारकडून कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
सरकार योजना पुढे लागू करणार नाही!दरम्यान, मनी कंट्रोलने एका सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सरकार ही योजना बंद करू शकते. गेल्या काही वर्षांत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, आता या योजनांमधील गुंतवणूक कमी होत आहे.
2023-24 मध्ये राष्ट्रीय लघु बचत निधीच्या कक्षेत या योजनांच्या संकलनात 20,000 कोटी रुपयांची घट झाली आहे. केवळ ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यात 1.12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दरम्यान, सरकारने 2024-25 साठी राष्ट्रीय लघु बचत निधीचे संकलन लक्ष्य 4.67 लाख कोटी रुपयांवरून 4.2 लाख कोटी रुपये केले आहे.