काल(दि.19) लोकसभेत मंजुर झालेल्या महिला आरक्षणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या आरक्षणांतर्गत महिलांना लोकसभेसह सर्व विधानसभेत आरक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, टाटा समुहातील एक अशी कंपनी आहे, ज्यातील महिलांना खास सुविधा दिल्या जातात. या कंपनीतील महिला राज पाहून, तुम्हाला महिला आरक्षणाचा विसर पडेल.
टाटा समूहाची TCS देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये आहे. कंपनीत 40% (2 लाख) कर्मचारी महिला आहेत. हा आकडा इतर कोणत्याही कंपनीपेक्षा जास्त आहे. कंपनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधाही पुरवते. विशेष म्हणजे, टीसीएस नोकरीत महिलांना अधिक प्राधान्य देते. TCS मध्ये 6,00,000 पेक्षा जास्त लोक काम करतात, त्यात 40 टक्के महिला आहेत.
कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 38.1 टक्के महिला होत्या. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एक चतुर्थांश नेतृत्व पदे देखील महिलांकडे होती. कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास प्राधान्य मिळते. महिला उमेदवारांना पदोन्नती आणि नोकरीतही प्राधान्य मिळते.
याशिवाय कंपनी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना जेवण आणि कॅब सुविधा पुरवते. महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा, प्रसूती रजा आणि सुरक्षिततेबाबतही जागरुक आहे.
या कंपन्यांमध्येही महिला'राज'
टाटाच्या टीसीएस व्यतिरिक्त इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि इनरवेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पेज इंडस्ट्रीजमध्येही महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. इन्फोसिसमध्ये 1,24,498 महिला कर्मचारी, विप्रोमध्ये 88,946 महिला कर्मचारी आणि एचसीएलमध्ये 62,780 महिला कर्मचारी आहेत. पेज इंडस्ट्रीजमध्येही 74% महिला कर्मचारी आहेत.