खाजगी क्षेत्रातील आरबीएल बँकेच्या (RBL Bank Share) शेअरमध्ये बुधवारी मोठी तेजी दिसून आली. आरबीएल बँकेचे शेअर्स 7.13 टक्क्यांनी किंवा 15.90 रुपयांनी वाढून 238.80 रुपयांवर बंद झाले. आरबीएल बँकेच्या शेअरमध्ये या वाढीमागील कारण म्हणजे महिंद्रा समूह आहे. महिंद्रा समुहाच्या एका कंपनीनं आरबीएल बँकेत 4.9 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. खुल्या बाजारातून हा व्यवहार झाला. आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेत कंपनीचं शेअरहोल्डिंग 5 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास, यापेक्षा जास्त शेअर होल्डिंगसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक आहे. महिंद्रा समूह देखील आर्थिक सेवांमध्ये कार्यरत आहे. समुहाची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्व्हिसेस आर्थिक सेवा पुरवत आहे.
डिसेंबर 2021 मध्ये, आरबीएल बँकेच्या आर्थिक स्थितीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेनं त्यांचे प्रमुख जीएम योगेश के दयाल यांची आरबीएल बँकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. तर तत्कालीन सीईओ विश्ववीर आहुजा रजेवर गेले होते. नंतर बँकेच्या बोर्डाने राजीव आहुजा यांची अंतरिम एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली. सध्या आर सुब्रमण्यकुमार हे आरबीएल बँकेचे एमडी आणि सीईओ आहेत. याआधी ते इंडियन ओव्हरसीज बँकेचे एमडी आणि सीईओ होते.
500 पेक्षा अधिक शाखाआरबीएल बँक 500 पेक्षा अधिक शाखांच्या नेटवर्कसह संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे. जून तिमाहीत या बँकेच्या निव्वळ नफ्यात 43 टक्क्यांनी वाढ होऊन तो 288 कोटी रुपयांवर पोहोचलाय. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न 21 टक्क्यांनी वाढले आहे. यासह ते 1246 कोटी रुपयांवर पोहोचलेय. अॅडव्हान्स्डमधील मजबूत ग्रोथ आणि नेट इंटरेस्ट मार्जिनमधील विस्तारामुळे ही वाढ दिसून आलीये.