Join us

Mahindra ची भन्नाट कामगिरी! ‘मेरू कॅब्स’चे केले अधिग्रहण; वाहतूक क्षेत्रात विस्ताराची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 8:34 PM

महिंद्रा समूहातील महिंद्रा लॉजिस्टिक्सने मेरू कॅब्सच्या अधिग्रहणाची घोषणा केली.

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून आपल्या दमदार कामगिरीमुळे Mahindra & Mahindra कंपनी भारतीय बाजारात विविध कंपन्यांना मागे टाकत अनेक पायऱ्या वर चढली आहे. यातच आता महिंद्रा समूहातील महिंद्रा लॉजिस्टिक्सने मेरू कॅब्सच्या अधिग्रहणाची घोषणा केली. मेरू ट्रॅव्हल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे १०० टक्के अधिग्रहण करण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक क्षेत्रात विस्ताराच्या धोरणात्मक हेतूने महिंद्रा लॉजिस्टिक्सने मेरू कॅब्जचे अधिग्रहण केले असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्सने १०० टक्के भाग भांडवलाचे अधिग्रहण करताना मेरू मोबिलिटी टेक प्रायव्हेट लिमिटेड, व्ही लिंक फ्लीट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, व्ही-लिंक ऑटोमेटिव्ह सर्व्हिस यांची हिस्सेदारी मेरू ट्रॅव्हल सोल्युशन प्रायव्हेटकडून आणि महिंद्रा अँड महिंद्राकडून मिळविली आहे.

लोकांच्या प्रवासाच्या पद्धतीत एक क्रांतिकारक बदल

सन २००६ मध्ये मेरू कॅब्स मुंबईपासून कार्यरत झालेली देशातील पहिली फोन-कॉल आणि अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा आहे. एका कॉलद्वारे ग्राहकांच्या दारात वातानुकूलित टॅक्सी उभी राहण्याची सुविधा या कंपनीने उपलब्ध करून दिली आणि लोकांच्या प्रवासाच्या पद्धतीत एक क्रांतिकारक बदल घडविला. आताच्या घडीलाही विमानतळांवर प्रवाशांची वाहतूक, शेअर राईड आणि मोठ्या कंपन्यांच्या कर्मचारी वाहतूक सेवा पुरविण्यामध्ये मेरूचे वर्चस्व आहे. 

दरम्यान, महिंद्रा लॉजिस्टिक्स ‘एंटरप्राइज मोबिलिटी सर्व्हिस’ क्षेत्रात ‘अलाइट’ या नाममुद्रेसह कार्यरत आहे. या अधिग्रहणानंतर महिंद्रा लॉजिस्टिक्स ग्राहक केंद्रित आणि विद्युत-शक्तीवर चालणाऱ्या वाहनांद्वारे सामायिक वाहतूक क्षेत्रात धोरणात्मक लक्ष केंद्रित करणार आहे, असे महिंद्रा लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन यांनी सांगितले. मेरू आणि अलाइटच्या एकत्रित क्षमतेतून महिंद्रा लॉजिस्टिक्स बी२सी क्षेत्रात आणि ग्राहकांना अधिक सुरक्षित, उत्कृष्ट सेवा देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :महिंद्रा