Join us  

मैत्रेयच्या ठेवीदारांना पैसे परत देणे सुरू

By admin | Published: August 11, 2016 2:11 AM

मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीजमध्ये पैसे गुंतविलेल्या ठेवीदारांचे पैसे व्याजासकट परत देण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील १२५ ठेवीदारांना १७ लाख रुपये परत करण्यात आले आहेत

मुंबई : मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीजमध्ये पैसे गुंतविलेल्या ठेवीदारांचे पैसे व्याजासकट परत देण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील १२५ ठेवीदारांना १७ लाख रुपये परत करण्यात आले आहेत, अशी माहिती मैत्रेयच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा सत्पाळकर यांनी दिली आहे. सर्व गुंतवणूकदारांच्या रकमा कंपनी टप्प्याटप्प्याने आणि न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात येणार असल्याचा दावा करून त्यांनी सांगितले की, ‘न्यायालयाच्या मान्यतेमुळेच गुंतवणूकदारांना रकमा परत करण्याचा मार्ग मोकळा झाला.’मैत्रेयच्या एस्क्रो अकाउंटमध्ये सव्वासहा कोटींहून अधिक रक्कम असून, त्या खेरीज कंपनीच्या अनेक मालमत्ताही आहेत. त्यातून गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यात येतील. आमच्या सर्व्हरपासून सर्व ठेवीदारांची माहिती, कंपनी, तसेच मालमत्तांची सर्व कागदपत्रे नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत. अन्यत्र कुठेही गुन्हा नोंदविताना आमच्याशी संपर्क साधावा, अशा संदेश नाशिक पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना पाठविला. सर्व तक्रारी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या, गुंतवणूकदारांची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून, कायदेशीर मार्गानेच त्या कंपनीने गुंतवणूक केली आहे, असे त्यांनी पत्रकाद्वारे नमूद केले आहे.(प्रतिनिधी)