एलआयसी हाऊसिंग फायनान्सने एस्सेल समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या मालमत्तेचा 'प्रतिकात्मक ताबा' घेतला आहे. सुभाष चंद्रा यांनी ५७० कोटी रुपयांचे कर्ज न भरल्यानं एलआयसी हाउसिंग फायनान्सनं मालमत्तेचा ताबा घेतल्याची माहिती समोर आली आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सनं यासंदर्भात एक जाहिरातही दिली आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरातील बॅकबे रिक्लेमेशन इस्टेटमधील एक भूखंड ताब्यात घेण्यात आला असल्याचं एलआयसी हाऊसिंग फायनान्सनं दिलेल्या जाहिरातीत नमूद करण्यात आलंय.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सनं १३ डिसेंबर २०२१ रोजी एक डिमांड नोटीस जारी केली होती. यामध्ये वसंत सागर प्रॉपर्टीज आणि पॅन इंडिया इन्फ्रा प्रोजेक्ट्ससोबत गॅरेंटर सुभाष चंद्रा यांना ६० दिवसांच्या आत जवळपास ५७० कोटी रूपयांची रक्कम परत करण्यास सांगण्यात आलं होतं, असं दिलेल्या जाहिरातीत नमूद करण्यात आलंय.
कर्ज घेणारे / गॅरेंटर यांच्याकडून रक्कम न मिळाल्यामुळे कर्ज घेतलेले / गॅरेंटर आणि विशेषकरून सामान्य जनतेला हे सांगण्यात येतंय की एन्फोर्समेंट नियम २००२ अंतर्गत मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेण्यात आला आहे, असं जाहिरातीत नमूद केलंय. कर्ज घेतलेल्यांनी आणि गॅरेंटरनं किंवा सामान्य जनतेनं मालमत्तेचा व्यवहार न करण्याचा इशाराही यात देण्यात आलाय.