प्रवाशानं इंडिगोच्या वैमानिकाच्या कानशिलात लगावल्याची घटना ताजी असतानाच मुंबई विमानतळावरचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. १४ जानेवारीला गोव्याहून दिल्लीला जाणारं विमान मुंबईला वळविण्यात आलं होतं. यानंतर प्रवाशांचा संयम संपला आणि त्यांनी विमानतळाच्या टरमॅकवरच बसकण मारली. तिथेच त्यांना जेवण, पाणी आदी देण्यात आलं होतं. याचा व्हिडीओ व्हायरलही झाला होता. आता या प्रकरणी सरकानं मोठी कारवाई केली आहे.
ही बाब गांभीर्यानं घेत ब्युरो ऑफ सिव्हिए एव्हिएशन सिक्युरिटीनं मुंबई विमानतळ आणि इंडिगोला कारणे द्या नोटीस बजावली होती. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला १.२० कोटी रुपयांचा तर मुंबई विमानतळाला ६० लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. डीजीसीएने एअर इंडिया आणि स्पाइसजेटला प्रत्येकी ३० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. नियामकानं मुंबई विमानतळाला ३० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अशाप्रकारे मुंबई विमानतळाकडून एकूण ९० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.
डीजीसीएनं काय म्हटलं?
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, डीजीसीएनं सांगितलं की मुंबई विमानतळानं १७ जानेवारीला कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिलं, परंतु ते असमाधानकारक आढळलं. हवाई सुरक्षा परिपत्रकाचं पालन करण्यात अपयश आल्याचं विमानतळाच्या प्रतिसादावरून स्पष्ट झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, मुंबई विमानतळानं एका निवेदन जारी केलं. सीआयएसएफच्या क्विक रिस्पॉन्स टीमसह प्रवाशांना सुरक्षित स्थळी क्षेत्रात नेण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान इंडिगोनंही यावर प्रतिक्रिया दिली असून या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे आणि प्रोटोकॉलनुसार नोटीसला उत्तर दिलं जाणार असल्याचं म्हटलं.