रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील पाच बँकांवर मोठी कारवाई केली आहे. या बँकांपैकी कुठल्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर या पाच बँकांमधून ग्राहक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाहीत. बँकांची बिघडत असलेली आर्थिक स्थिती पाहून रिझर्व्ह बँकेने या बँकांवर कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये महाराष्ट्रातील दोन बँकांचाही समावेश आहे.
रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या बँकांवर पुढील सहा महिन्यांपर्यंत निर्बंध लागू राहतील. म्हणजेच पुढच्या सहा महिन्यांपर्यंत या बँकांत खाते असलेले ग्राहक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाहीत. त्याबरोबरच या बँका रिझर्व्ह बँकेंला कल्पना दिल्याशिवाय कर्ज देऊ शकणार नाहीत. तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूकही करू शकणार नाहीत. या बँकांकडे आता कुठल्याही प्रकारचं कर्ज देण्याचा अधिकार नसेल. त्याशिवाय आणखी कुठलीही जबाबदारी उचलता येणार नाही. त्याबरोबरच कुठल्याही प्रकारच्या संपत्तीचा व्यवहार किंवा अन्य कुठलाही उपयोग करता येणार नाही.
रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेल्या बँकांमध्ये एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ (उत्तर प्रदेश), आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि शिमशा सहकार बँक नियमित, मद्दूर, मांड्या (कर्नाटक) च्या सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे या बाँकांचे ग्राहक आपल्या खात्यामधून पैसे काढू शकणार नाहीत.
तर उर्वाकोंडा सहकारी नगर बँक, उर्वाकोंडा (अनंतपूर जिल्हा), आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँकांमधील ग्राहकांना केवळ ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. आरबीआयने सांगितले की, पाच सहकारी बँकांचे पात्र ठेविदार विमा आणि क्रेडिट हमी नियमाप्रमाणे पाच लाख रुपयांपर्यंतची जमा विमा दावा रक्कम मिळवण्यास पात्र असतील.