Tata Group : देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असलेल्या TATA समूहात मोठा बदल झाला आहे. टाटा समूहावर नियंत्रण ठेवणाऱ्या TATA ट्रस्टने एक विशेष कार्यकारी समिती स्थापन केली आहे, जी आता कंपनीशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेईल. रतन टाटा यांना समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह उपाध्यक्ष असतील.
समिती स्थापन करण्याचे कारण काय?
कंपनीच्या संचालक मंडळाच्या संमतीशिवाय दैनंदिन कामांवर लवकरच निर्णय घेता यावा, यासाठी समिती स्थापन केली आहे. दरम्यान, टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे, ज्यावर टाटा ट्रस्टचे नियंत्रण आहेत. अशा परिस्थितीत टाटा सन्स आणि एकूणच टाटा समूहाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात टाटा ट्रस्टची भूमिका महत्वाची आहे.
टाटा ट्रस्टमध्ये अनेक बदल
दरम्यान, टाटा ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा उप्पलुडी यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुमारे एक वर्षापूर्वी एप्रिल 2023 मध्ये त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. हे पद मिळवणाऱ्या त्या पहिल्या होत्या. अपर्णा यांच्यानंतर आता सिद्धार्थ शर्मा यांना टाटा ट्रस्टचे सीईओ बनवण्यात आले.
टाटा ट्रस्ट किती मोठी आहे?
टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची 66 टक्के भागीदारी आहे. टाटा ट्रस्ट ही टाटा कुटुंबातील सदस्यांचा समावेश असलेला सामाजिक संस्था आहे. यामध्ये टाटा कुटुंबातील सदस्यांशी संबंधित इतर अनेक ट्रस्टचा समावेश आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट, या सर्वात मोठे ट्रस्ट आहेत. सध्या टाटा ट्रस्टचे प्रमुख रतन टाटा आहेत.