- प्रसाद गो. जोशी
जागतिक पातळीवर असलेले नकारात्मक वातावरण, जगभरातील अर्थव्यवस्थांना मंदीला तोंड द्यावे लागण्याची व्यक्त होत असलेली शक्यता, अमेरिका-चीन व्यापार युद्धाची चिघळलेली परिस्थिती यामुळे जगभरातील शेअर बाजार मंदीत होते. त्याचा परिणाम भारतातील बाजारावर काही प्रमाणात झाला. रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरामध्ये घट केल्यानंतरही आस्थापनांच्या नकारात्मक निकालांमुळे बाजार अस्थिर राहिला.
गत सप्ताहाचा प्रारंभ काहीसा निराशेनेच झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक काहीसा घसरून सुरू झाला. सप्ताहामध्ये तो ३७,१७२.१८ ते ३६,२२५.४८च्या दरम्यान आंदोलने घेत अखेरीस ३६,५४६.४८ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ७७.०५ अंशांची अल्पशी वाढ झाली.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्ताहात ४९.९५ अंश असा किरकोळ वाढून १०,९४३.६० अंशांवर बंद झाला. सप्ताहामध्ये या निर्देशांकाने ११ हजार अंशांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, अखेरच्या दिवशी झालेल्या मोठ्या विक्रीमुळे त्याला हा टप्पा कायम राखता आला नाही. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमधील घसरण सुरूच राहिली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप ३१२.१७ अंशांनी घसरून १४,३२८.८१ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक १३,६५६.७५ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये २९३.७० अंशांची मोठी घट झाली.
रिझर्व्ह बॅँकेने पतधोरणामध्ये रेपो दरात कपात केल्याने बाजार जोरात होता. नवीन गव्हर्नरांनी पहिल्याच धोरणामध्ये दरकपात केल्याने, तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीचे आशादायक चित्र रेखाटल्याने बाजार वाढला.
मात्र, सप्ताहाच्या अखेरीस आलेल्या काही आस्थापनांच्या निकालामुळे बाजारात निराशा पसरली आणि मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. आगामी सप्ताहातही आंतरराष्टÑीय परिस्थिती, औद्योगिक उत्पादनाची जाहीर होणारी आकडेवारी आणि चलनवाढीचा दर, तसेच विविध आस्थापनांचे जाहीर होणारे निकाल या बाबीच बाजाराला दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.
इक्विटी योजनांमधील गुंतवणूक घटली
म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांपैकी इक्विटीशी संबंधित योजनांमधील गुंतवणूक कमी होतांना दिसत असली, तरी अन्य काही प्रकारांमधील गुंतवणुकीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे मिळणारा कमी परतावा आणि आगामी निवडणुका ही त्यामागील प्रमुख कारणे असण्याची शक्यता आहे.
म्युच्युअल फंडांच्या इक्विटी संबंधित योजनांमध्ये डिसेंबर, २०१८मध्ये ४४४२ कोटी रुपये भरले गेले असून, हा २७ महिन्यांमधील नीचांक आहे. जानेवारी महिन्यात अशा योजनांमधील गुंतवणूक काहीशी वाढून ५,०८२ कोटी रुपये झाली आहे. मुख्यत: मिडकॅप आणि स्मॉलकॅप योजनांमध्ये मिळत असलेल्या नकारात्मक परताव्यामुळे गुंतवणूकदार या योजनांपासून दूर जात असावेत.
जानेवारी महिन्यामध्ये डेट फंडांमध्ये ६०,६२८ कोटी तर इएलएसएस योजनांमध्ये १२४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे.
नकारात्मक शक्यतांमध्येही प्रमुख निर्देशांकांची वाढ
जागतिक पातळीवर असलेले नकारात्मक वातावरण, जगभरातील अर्थव्यवस्थांना मंदीला तोंड द्यावे लागण्याची व्यक्त होत असलेली शक्यता, अमेरिका-चीन व्यापार युद्धाची चिघळलेली परिस्थिती यामुळे जगभरातील शेअर बाजार मंदीत होते.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:54 AM2019-02-11T00:54:35+5:302019-02-11T00:54:52+5:30