बेंगळुरू : ऑटो, बांधकाम क्षेत्राला मंदीने विळखा घातलेला असताना देशाचा आर्थिक कणा बनलेल्या आयटी सेक्टरमधूनही निराशाजनक बातमी येत आहे. भारतातील आयटी कंपन्या येत्या काही महिन्यांत तब्बल तीस ते चाळीस हजार मध्यम पदांवरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याचे सुतोवाच आयटी इंडस्ट्रीचे तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी केले आहे.
पै यांनी ही नोकरकपात दर पाच वर्षांनी होणारी नेहमीची कपात असल्याच म्हटले आहे. पै यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, पश्चिमेकडील देशांमध्ये सर्व क्षेत्रांसारखाच भारतातही एक क्षेत्र परिपक्व होते. यामध्ये मध्यम क्षेणींतील असे कर्मचारी असतात जे समसमान योगदान देऊ शकत नाहीत. जेव्हा कंपनी वेगाने विकास करत असेल तेव्हा बढती ठीक आहे. मात्र, जेव्हा विकास खुंटलेला असेल तेव्हा मात्र कर्मचारी कपातही करावी लागते. ही प्रक्रिया दर पाच वर्षांनी करावी लागते.
पै हे सध्या आरिन कॅपिटल अँड मनिपाल ग्लोबल एज्युकेशन सव्हिसेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की, कोणालाही मोठ्या पगाराची नोकरी करण्याचा हक्क नाही, जोपर्यंत तो चांगली कामगिरी करत नाही. तुम्हाला योगदान द्यावेच लागते. पुढील वर्षभरात नोकरी गमावणारे लोक जर तज्ज्ञ असतील तर त्यांना पुन्हा नोकरी मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.