Join us

घराचं स्वप्न पाहताय? 31 मार्चपर्यंत थांबा, लवकरच मिळणार गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:39 PM

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनंतर सर्व बँका ग्राहकांना दिलासा देणार

नवी दिल्ली: देशातील बँकांनी कर्जावरील व्याज दर कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सर्वच बँकांना कर्जावरील व्याज दर कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र नफ्यात घट होऊ शकते, हे कारण बँकांकडून दिलं जात होतं. मात्र गेल्याच बैठकीत रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना व्याज दरात कपात करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे लवकरच बँकांकडून व्याज दरात 5 ते 10 बेसिस पॉईंट्सची घट केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेनं काही दिवसांपूर्वी त्रैमासिक पतधोरण जाहीर केलं. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट कपात करण्याची घोषणा आरबीआयकडून करण्यात आली. यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं व्याज दरात घट केली. यानंतर आरबीआयनं इतर बँकांनाही व्याजाच्या दरात कपात करण्याच्या सूचना केल्या. 'व्याज दर कमी करुन ग्राहकांना रेपो रेटमधील कपातीचा फायदा द्या,' असं आरबीआयनं बँकांना सांगितलं होतं. यासाठी बँकांना मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्समध्ये (एमसीएलआर) कपात करावी लागेल. आरबीआयच्या सूचनेनंतर काही बँकांनी एमसीएलआरमध्ये कपात केली. तर इतर बँका 31 मार्चपर्यंत हे पाऊल उचलतील. बहुतांश बँका किंवा सर्व सरकारी बँका 5 ते 10 बेसिस पॉईंट्सची कपात करतील, असा अंदाज बँकिंग क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं वर्तवला. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं सार्वजनिक क्षेत्रातील कमीत कमी 4 आणि खासगी क्षेत्रातील एक बँक याच आठवड्यात व्याज दरात कपात करुन ग्राहकांना दिलासा देतील, असं म्हटलं. 'व्याज दर कमी करुन अर्थव्यवस्थेला गती द्या. तुमच्या नफ्याला धक्का न पोहोचवता काही फायदा ग्राहकांनादेखील द्या,' अशी सूचना आरबीआयनं बँकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

टॅग्स :घरबँकभारतीय रिझर्व्ह बँक