नवी दिल्ली : कोरोनाची ओसरलेली लाट, शिथिल झालेले निर्बंध, नवरात्रोत्सवाचा शुभ मुहूर्त आणि तोंडावर आलेला दिवाळीचा सण या पार्श्वभूमीवर ग्राहक नवीन वस्तू खरेदीच्या तयारीत आहे. बाजारात मागणीही वाढली आहे. परंतु नेमक्या याच काळात सेमी कंडक्टर चीपची कमतरता भासू लागल्याने लोकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. या चीप नसल्याने एसयूव्ही कार तसेच अनेक गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनांना फटका बसणार आहे. परिणामी ग्राहकांना या वस्तूंसाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.
चीपच्या कमतरतेमुळे मारुती स्विफ्ट, ह्युंडाई आय १०, निसान मॅग्नाईट, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस यासह टोयोटा आणि मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या आलिशान गाड्यांसाठी ग्राहकांना तीन ते सहा महिने अधिक वाट पहावी लागणार आहे. ॲपलच्या नव्या आयफोन-१३ ची ऑनलाईन खरेदी करायची असेल तर महिनाभरासाठी वाट पहावी लागत आहे. ग्राहकांकडून उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परंतु याची वेळेवर पूर्तता करणे शक्य होत नसल्याने विक्रेत्या कंपन्याही त्रासून गेल्या आहेत. ग्राहकांमधील रोषाला सोशल मीडियावर वाचा फुटू लागल्याने ब्रँडच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती वाढू लागली आहे.
ह्युंदाईकडे १ लाख गाड्यांची तर कियाकडे ७५ हजार, निसानकडे २५ हजार तर टोयोटाकडे १४ हजार गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मर्सिडीज बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक मार्टीन श्वेन्क म्हणाले की, सध्या मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना चार ते ३२ आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. ॲपलच्या सर्वात मोठी किरकोळ विक्री करणारी कंपनी ॲप्ट्रॉनिक्सच्या संचालक मेघना सिंग म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात आलेल्या आयफोन-१३ चे सर्व संच दोन-तीन दिवसात ग्राहकांना वितरित करण्यात आले. परंतु आता मागणी खूप वाढली आहे.
उत्पादनावरही परिणाम
मारुतीचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की, माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मी अशी स्थिती पाहिलेली नाही. सर्व कंपन्यांच्या मॉडेल्सच्या बाबतीत प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. मागणी वाढल्याने सर्वच कंपन्यांची धावपळ सुरू आहे. चीपच्या कमतरतेमुळे मारुतीने ऑक्टोबरमध्ये उत्पादन ४० टक्क्यांनी कमी केले, तर सप्टेंबरमध्ये त्यात ६० टक्क्यांनी कपात केली होती. ग्राहकांनी नोंदवलेल्या २.१५ लाख गाड्यांच्या मागणीची पूर्तता आम्हाला करावयाची आहे.