नवी दिल्ली - राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी ‘फ्लेक्स-फ्युअल’, म्हणजेच एकापेक्षा जास्त इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
‘फ्लेक्स इंधन’ वाहने पेट्रोल व्यतिरिक्त इथेनॉल किंवा मिथेनॉल मिश्रित पेट्रोलवरही चालतात. गडकरी म्हणाले की, कच्च्या तेलाची आयात कमी करण्याची आणि जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आम्हाला विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. यासंदर्भात सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी बोलणार असल्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मला दिले आहे.
सध्या किती टॅक्स ?
- सध्या, हायब्रीडसह पेट्रोल इंजिन असलेल्या वाहनांवर २८ टक्के आणि इलेक्ट्रिक वाहनांवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो.
- देश दरवर्षी २२ लाख कोटी रुपयांपर्यंतचा कोळसा, कच्चे तेल आयात करतो. ही केवळ इंधन नव्हे तर आर्थिक समस्याही आहे.
काय होईल?
- जैवइंधनाची किंमत कमी आहे आणि त्यामुळे प्रदूषणही होत नाही.
- त्यामुळे सर्वसामान्यांसाठीही ते फायदेशीर ठरणार आहे. वाहन उद्योगाने आतापर्यंत ४.५ कोटी रोजगार निर्माण केले आहेत.
- राज्य आणि केंद्र सरकारला सर्वाधिक जीएसटी भरणारा हा उद्योग आहे. जर जैवइंधनाचे चांगले तंत्रज्ञान असेल तर आपली निर्यात १० ते २० टक्क्यांनी वाढेल, असे ते म्हणाले.