Car Insurnace : महागाई फक्त आता किचनपुरती मर्यादीत राहिला नसून सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. तुम्ही वाहन खरेदी करायला गेला तरी कारच्या किमतीपासून वाहन विम्यापर्यंत तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागतात. जर तुम्हीही कार इन्शुरन्सच्या वाढत्या प्रीमियममुळे हैराण असाल, तर आज आम्ही तुम्हाला एक छान युक्ती सांगत आहोत. याचा वापर करून तुम्ही तुमच्या कारच्या विम्याची किंमत कमी करू शकता. शिवाय दरवर्षी विम्याचे नूतनीकरण करण्याच्या त्रासातूनही मुक्त होऊ शकता. अनेक विमा कंपन्या आता एकाच वेळी ३ वर्षांसाठी विमा संरक्षण देत आहेत. याच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात विमा तर मिळवू शकताच पण इतर फायदेही मिळवू शकता. शिवाय लेखाच्या शेवटी अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे आणखी काही पैसे वाचू शकतील.
कशी आहे कार विम्याची पॉलिसी?पारंपरिक विमा घेताना आपण एका वर्षांसाठी विमा खरेदी करत होतो. ज्याचे प्रत्येक वर्षी नुतनीकरण करावे लागते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला ३ वर्षांसाठी विमा संरक्षण मिळते. यामध्ये संपूर्ण ३ वर्षांसाठी स्वतःचे नुकसान (ऑन डॅमेज) आणि तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) कव्हर संरक्षण मिळते. पूर्वी थर्ड पार्टी ३ वर्षांसाठी होता. पण, ऑन डॅमेज केवळ एका वर्षासाठी मिळत होता. आता दोन्ही संरक्षण ३ वर्षांसाठी मिळणार आहे. नवीन कारसाठी आधीच अनिवार्य असलेल्या तीन वर्षांच्या थर्ड पार्टी कव्हरसह तीन वर्षांचे ऑन डॅमेज कव्हर एकत्र मिळणार आहे. याचा अर्थ पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करण्याची गरज भासणार नाही.
प्रीमियमवर होईल मोठी बचतपहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही ३ वर्षांची विमा पॉलिसी घेऊन प्रीमियमवर मोठी बचत करू शकता. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकांना प्रीमियमवर १०% पर्यंत सूट मिळते. उदाहरणार्थ, वार्षिक ऑन डॅमेज नूतनीकरण दरवर्षी ५-१०% ने वाढल्यास, तीन वर्षांची योजना १०% पर्यंत सूट देऊन खर्च स्थिर ठेवते. अशा प्रकारे आपण खूप बचत करू शकता. आपल्या वाहनाला दीर्घकाळ वाहन संरक्षण असावे असे वाटते. त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे. दुसरं म्हणजे कायद्यानुसार विमा कव्हर असल्याशिवाय तुम्ही वाहन चालवू शकत नाही.
थेट कंपनीकडूनच विमा खरेदी करानवीन वाहन घेताना तुम्हाला शो रूमवाले त्यांच्याकडूनच विमा खरेदी करण्याचा आग्रह करतात. जेणेकरुन त्यांना कमिशन मिळावे. मात्र, तोच विमा तुम्ही थेट कंपनीकडून खरेदी केला तर तुमचे काही हजार नक्कीच वाचतील. अलीकडच्या काळात पॉलिसीबाजार सारखे प्लॅटफॉर्मही तुम्हाला चांगली सूट देतात. तिथूनही तुम्ही वाहन विमा खरेदी करुन चांगली बचत करू शकता.